Breaking
Updated: नोव्हेंबर 17, 2025
चोरट्यांनी घर फोडून एक लाखाचे दागिने लांबविले
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelकेज – अज्ञात चोरट्यांनी दरवाजाचा कडी कोंडा तोडून घरात प्रवेश करीत लोखंडी कपाटात ठेवलेले १ लाख ४ हजार ४०० रुपयांचे ३६ ग्रॅमचे दागिने लंपास केल्याची घटना नांदूरघाट (ता. केज) येथे १७ नोव्हेंबर रोजी पहाटे ५.३० वाजेच्या सुमारास घडली.
नांदूरघाट (ता. केज) येथील अंगणवाडी मदतनीस संध्या संतोष क्षीरसागर या मुलासह घराला कुलूप लावून बाहेरगावी गेल्या होत्या. १७ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी घराचा कडी कोंडा तोडून घरात प्रवेश केला. घराची झडती घेऊन घरातील लोखंडी कपाट तोडून कपाटात ठेवलेले २४ हजार रुपयांचे ११ ग्रॅम सोन्याचे नेकलेस, १९ हजार ८०० रुपयांचे ९ ग्रॅमचे सोन्याचे मन्याचे गंठण, १३ हजार २०० रुपयांचे ६ ग्रॅमचे सोन्याचे झुंबर, १३ हजार रुपयांची अडीच ग्रॅमची सोन्याची अंगठी, ११ हजार रुपयांची ५ ग्रॅमची सोन्याची अंगठी, ८ हजार पाचशे रुपयांचे ३ ग्रॅमचे सोन्याचे पॅनडॉल, ३ हजार ८०० रुपयांचे २.७५ ग्रॅमचे कानातील सोन्याचे फुले, ३ हजार नऊशे रुपयांची अर्धा ग्रॅमची सोन्याची मोत्याची नथ, ३ हजार रुपयांची अर्धा ग्रॅमची सोन्याची लहान मुलीची अंगठी, ४ हजार दोनशे रुपयांचे चांदीचे ब्रासलेट असा १ लाख ४ हजार चारशे रुपयांचा ऐवज घेऊन चोरट्यांनी पोबारा केला. संध्या क्षीरसागर यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. तपास फौजदार जावेद कराडकर हे करीत आहेत.