Breaking
Updated: May 31, 2025
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channel‘विवेक सिंधु' व्हॉट्सॲप ग्रुप जॉइन करा
Join Groupचौकशीसाठी रोज तहसीलमध्ये चकरा, तहसीलदारांचे दुर्लक्ष
अंबाजोगाई – शासनाकडून संजय गांधी निराधार, विधवा, अपंग या लाभार्थीसाठी दर महिन्याला मानधन दिले जाते; परंतु अंबाजोगाई तालुक्यातील अनेक गावांतील लाभार्थीना दिवाळी पासून मानधन मिळाले नाही. त्यामुळे या लाभार्थीची उपासमार होत असल्याचे चित्र आहे.
दुसरीकडे, हे लाभार्थी रोज तहसील कार्यालयात चौकशीसाठी खेट्या मारतात. मात्र, त्यांना कोणीच दाद देत नसल्यामुळे लाभार्थी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. निराधारांच्या समस्येकडे तहसीलदार विलास तरंगे यांचे साफ दुर्लक्ष होत असल्याचे आरोप निराधार करीत आहेत.
संजय गांधी निराधार, विधवा, अपंग, वृद्ध यांच्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाकडून दर महिन्याला मानधन मिळते. शासनाकडून काही महिन्यांपासून आता या लाभार्थीच्या थेट खात्यावर डीबीटीद्वारे मानधन जमा होत आहे; परंतु या ऑनलाइन पद्धतीमुळे गेल्या अनेक वर्षांपासून मानधन सुरू असलेले संजय गांधी निराधार, विधवा, दिव्यांग असे शेकडो लाभार्थी गेल्या आठ महिन्यांपासून मानधनापासून वंचित असल्याचे उघडकीस आले आहे.
यामुळे त्यांची उपासमार होत आहे. अनेक वृद्ध, महिला, पुरुष यांना कुटुंबांनी नाकारले असल्यामुळे त्यांचा उदरनिर्वाह शासनाच्याच मिळणाऱ्या या मानधनावर चालतो; परंतु गेल्या आठ महिन्यांपासून हे लाभार्थी दररोज बँकेत जाऊन ‘आले का साहेब आमचे मानधन’ असे विचारतात. मात्र, त्यांना ‘नाही’ असे उत्तर मिळताच ते हिरमुसले जात असल्याचे चित्र आहे.
विशेष म्हणजे या लाभार्थीनी हयात प्रमाणपत्र, आधार कार्ड बँकेशी जोडणी, केवायसीसुद्धा केलेली असताना मानधन जमा का होत नाही, याबाबत शंका निर्माण झाली. याबाबत तहसील कार्यालयात संजय गांधी विभागात चौकशी करण्यासाठी गेल्यास प्रत्येक वेळी नवीन कागदपत्र जमा करण्याचे सांगितले जात असल्याच्या लाभार्थीच्या तक्रारी आहेत. लाभार्थ्यांना त्वरीत मानधन मिळाले नाही तर आंदोलन करण्याचा इशारा सामाजीक कार्यकर्ते दिपक शिंदे, खतीब बाबा, सुनंदा लोखंडे यांनी दिला आहे.
महिलांना आश्रु अनावर
अनेक महिला वयोवृध्द, विधवा व निराधार महिला आपले मानधन बंद असल्याने तहसील कार्यालयात आल्या होत्या. मागील आठ महिन्यापासून मानधन बंद असल्याने आजारासाठी लागणाऱ्या औषध-गोळ्या कश्या घ्याव्यात असे सांगतांना महिलांना आश्रू अनावर झाले होते.
माझ्या मुलाचे एक वर्षापुर्वी तर मालकाचे २२ वर्षापुर्वी निधन झाले आहे. आठ महिन्यापासून पगार बंद असल्यामुळे माझ्यासमोर खाण्या-पिण्याचे वांदे निर्माण झाले आहे. आमच्या मानधनाकडके तहसीलदार लक्ष देत नाहीत. मी सात वेळा मानधना बाबत चौकशी करण्यासाठी आली आहे, तरी मानधन सुरु झाले नाही. –आवर्षणा गडदे (लाभार्थी, राक्षसवाडी)