Vivek Sindhu - Latest Marathi News

Breaking

बीडमध्ये महिला व बाल विकास विभागाचा अजब कारभार; ‘लाडक्या बहिणी’ला ठरवले ‘भाऊ’, १६,५०० रुपये वसुलीची धाडली नोटीस!

Updated: जानेवारी 2, 2026

By Vivek Sindhu

WhatsApp Image 2026 01 02 at 12.38.53 PM

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

बीड: जिल्हयातील प्रशासकीय यंत्रणेचा ढिसाळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. ‘लाडकी बहीण’ योजनेच्या लाभार्थी असलेल्या उमरी (ता. अंबाजोगाई) येथील मीना आश्रुबा पवळे या महिलेला चक्क ‘पुरुष’ ठरवून त्यांच्याकडून ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचे पैसे वसूल करण्याची नोटीस जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयाने बजावली आहे. या धक्कादायक प्रकारामुळे लाभार्थी महिलेला मनस्ताप सहन करावा लागत असून, प्रशासनाच्या या भोंगळ कारभारावर सर्वत्र टीकेची झोड उठत आहे.

जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, बीड यांच्या स्वाक्षरीने १२ डिसेंबर २०२५ रोजी मीना आश्रुबा पवळे यांना एक नोटीस पाठवण्यात आली आहे. या नोटिसीमध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे की, “मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेच्या अटी व शर्तीनुसार पात्र नसताना सदर योजनेचा पुरुषाकडून आर्थिक लाभ घेतल्याचे निदर्शनास आले आहे.” या कारणास्तव मीना पवळे यांनी योजनेअंतर्गत मिळवलेले १६,५०० रुपये तातडीने कार्यालयात जमा करावेत, असे आदेश देण्यात आले आहेत.

प्रत्यक्षात मीना पवळे या महिला असतानाही केवळ कागदपत्रांची पडताळणी न करता किंवा सरसकट ‘कॉपी-पेस्ट’ पद्धतीने नोटिसा काढण्याच्या घाईत प्रशासनाने हे मोठे अजब कृत्य केले आहे. एका महिलेला पुरुष ठरवून तिच्याकडून वसुलीचा तगादा लावणे, हे केवळ हास्यास्पद नसून सरकारी यंत्रणेच्या कामातील अत्यंत गंभीर निष्काळजीपणा दर्शवते. ज्या योजनेचे नावच ‘लाडकी बहीण’ आहे, त्याच योजनेत बहिणीला ‘भाऊ’ समजून नोटीस धाडल्याने विभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

या प्रकारामुळे संबंधित महिला आणि तिचे कुटुंब सध्या कमालीच्या तणावाखाली आहे. एकीकडे सरकार महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी ही महत्त्वाकांक्षी योजना राबवत आहे, तर दुसरीकडे प्रशासकीय अधिकारी लाभार्थ्यांची प्राथमिक माहितीही न तपासता अशा प्रकारे नोटिसा पाठवत असल्याने संताप व्यक्त होत आहे. या प्रकारामुळे ग्रामीण भागातील लाभार्थी महिलांमध्ये संभ्रम आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तांत्रिक चुकांच्या नावाखाली होणारा हा खेळ थांबवून मीना पवळे यांना दिलेली चुकीची नोटीस तात्काळ रद्द करावी आणि त्यांना नाहक होणारा त्रास थांबवावा, अशी भावना व्यक्त होत आहे.


Categories

Recent Posts