Breaking
Updated: एप्रिल 21, 2026
बोलेरो पिकअपसह तिघांना अटक
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelबीड: पेठ बीड पोलीस ठाण्याच्या हद्दीत जनावरे चोरून नेणाऱ्या एका टोळीला पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने रंगेहात पकडून त्यांच्याकडून ४ लाख १५ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. २० एप्रिल २०२६ रोजी पोलीस निरीक्षक मारुती खेडकर हे आपल्या कर्मचाऱ्यांसह गस्तीवर असताना जी.एन. फंक्शन हॉल परिसरात जनावरे चोरणाऱ्यांना लोकांनी पकडल्याची माहिती त्यांना मिळाली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन आरोपींच्या ताब्यातील बोलेरो पिकअप आणि चोरी केलेले गोवंशीय गोऱ्हे ताब्यात घेतले.
या प्रकरणी पोलिसांनी असीम जाफर कुरेशी, अजिम आझाद कुरेशी (दोघे राहणार महमदीया कॉलनी) आणि कुरेशी शहनवाज कुरेशी एजाज (राहणार पेठ बीड) या तिघांना अटक केली आहे. आरोपींनी प्राथमिक चौकशीदरम्यान हे जनावरे कत्तल करण्याच्या उद्देशाने चोरून नेत असल्याची कबुली दिली आहे. पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून १५ हजार रुपये किमतीचा गोऱ्हा आणि ४ लाख रुपये किमतीची बोलेरो पिकअप (क्रमांक एम.एच.२३ ए.यु. १०१५) जप्त केली आहे.
फिर्यादी सईद अब्दुल करीम कुरेशी यांच्या तक्रारीवरून पेठ बीड पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ११६/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता (BNS) आणि महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींची पुढील तपासासाठी पोलीस कोठडी घेण्यात आली असून पोलीस हवालदार माने या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत काँवत आणि अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मारुती खेडकर व त्यांच्या पथकाने यशस्वी केली.