Breaking

पत्नी हरवल्याची खोटी माहिती देणे पडले महागात; ‘डायल ११२’ चा गैरवापर करणाऱ्या तळीरामावर गुन्हा दाखल

Updated: फेब्रुवारी 14, 2026

By Vivek Sindhu

चोरीच्या तारा घेऊन जाणाऱ्या पिकअपवर कारवाई

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

परळी: आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांच्या मदतीसाठी असलेल्या ‘डायल ११२’ या सुविधेचा गैरवापर करून पोलिसांची दिशाभूल करणाऱ्या एका इसमावर परळी ग्रामीण पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. दारूच्या नशेत असलेल्या या व्यक्तीने आपली पत्नी बेपत्ता झाल्याची खोटी माहिती वारंवार पोलिसांना देऊन प्रशासकीय यंत्रणेचा वेळ वाया घालवला. ही घटना १२ फेब्रुवारी २०२६ रोजी परळी तालुक्यातील हेळंब येथे उघडकीस आली असून, याप्रकरणी गोविंद गजेंद्र भारती याच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, १२ फेब्रुवारी रोजी पोलीस कॉन्स्टेबल महादेव बबन केदार हे डायल ११२ च्या कर्तव्यावर असताना त्यांना गोविंद भारती याने कॉल करून पत्नी बेपत्ता असल्याची माहिती दिली. या माहितीवरून पोलीस पथकाने तातडीने हेळंब गाठून संबंधित इसमाची भेट घेतली असता तो दारूच्या अंमलाखाली असल्याचे दिसून आले. पोलिसांनी अधिक चौकशी केली असता, त्याच्या दारू पिण्याच्या त्रासाला कंटाळून त्याची पत्नी माहेरी निघून गेली होती आणि ही बाब गोविंदला पूर्णपणे माहित होती. केवळ पोलिसांना त्रास देण्याच्या उद्देशाने त्याने हा खोटा बनाव रचल्याचे तपासात निष्पन्न झाले.
धक्कादायक बाब म्हणजे, या इसमाने ११ फेब्रुवारी रोजी देखील अशाच प्रकारे खोटी तक्रार केली होती, त्यावेळी पोलिसांनी त्याला समज देऊन सोडले होते. वारंवार तोच प्रकार केल्याने पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याची उपजिल्हा रुग्णालय, परळी येथे वैद्यकीय तपासणी केली. याप्रकरणी परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम २१२, २२३ आणि महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या कलम ८५(१) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. आपत्कालीन सुविधेचा गैरवापर करणाऱ्यांवर यापुढेही कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलीस निरीक्षक एम.ए. सैय्यद यांनी दिला आहे.


Categories

Recent Posts