Breaking
Updated: जून 18, 2026
वडवणी येथील शिक्षक कॉलनीत घरफोडी; २६ हजारांचा मुद्देमाल लंपास
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelवडवणी: शहरातील शिक्षक कॉलनी भागात अज्ञात चोरट्यांनी एका बंद घराचे कुलूप तोडून सोन्याचे दागिने आणि रोख रकमेसह २६ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घरफोडी १६ जून रोजी सायंकाळी ६ ते १७ जून रोजी दुपारी १२ वाजेच्या दरम्यान घडली असून, याप्रकरणी १७ जून रोजी सायंकाळी वडवणी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शिक्षक कॉलनी येथील रहिवासी असलेले शेतकरी विनायक लक्ष्मण तिडके (वय ५०) यांचे घर बंद असताना अज्ञात चोरट्यांनी घराच्या दरवाजाचा कडी-कोंडा तोडून आत प्रवेश केला. चोरट्यांनी घरातील कपाटातून ५ ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी, ७ ग्रॅम वजनाचे सोन्याचे झुंबर, ४ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मणी-मंगळसूत्र आणि १० हजार रुपयांची रोकड असा एकूण २६ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. तिडके यांनी घरात चोरी झाल्याचे पाहिल्यानंतर तातडीने पोलिसांत धाव घेतली. वडवणी पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक वर्षा व्हागाडे यांच्या आदेशानुसार अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस हवालदार राऊत या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.