Breaking

बस प्रवासादरम्यान महिलेच्या पर्सवर डल्ला , 95 हजारांचा ऐवज लंपास

Updated: ऑगस्ट 16, 2025

By Vivek Sindhu

बस प्रवासादरम्यान महिलेच्या पर्सवर डल्ला , 95 हजारांचा ऐवज लंपास

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

अंबाजोगाई : राखीपोर्णिमा आटोपून बीडला परत जाणाऱ्या एका महिलेच्या पर्सवर एस.टी. बसमधील गर्दीचा फायदा घेत तीन अनोळखी महिलांनी हात साफ करत दागिने व रोख रक्कम असा सुमारे 95 हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी अंबाजोगाई ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लता बालासाहेब साळवे (वय 40, रा. धानोरा रोड, बीड) या रक्षाबंधनानिमित्त माहेरी अंबाजोगाई येथे आल्या होत्या. दिनांक 12 ऑगस्ट रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास त्या अंबाजोगाई येथून बीडकडे जाण्यासाठी छत्रपती संभाजीनगर मार्गावरील एस.टी. बसमध्ये चढल्या. बसमध्ये मोठी गर्दी असल्याने त्या उभ्या राहिल्या. त्यावेळी त्यांच्या पायाजवळ एक अनोळखी महिला बसली होती, तर दोन महिला उभ्या होत्या.

लोखंडी सावरगाव येथे या तिन्ही महिला गर्दीतून उतरत असताना लता साळवे यांना संशय आला. त्यांनी लगेचच आपली पर्स तपासली असता त्यातील एक तोळ्याचे झुंबर कानातले, पाच ग्रॅम वजनाचे मनी मंगळसूत्र व पाच हजार रुपये रोख रक्कम असा एकूण 95 हजार रुपयांचा ऐवज चोरीस गेलेला आढळला. त्यानंतर त्यांनी होळ येथे उतरून अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यात चोरीची तक्रार दिली. पोलिसांनी अनोळखी तिन्ही महिलांविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार प्रवीण उल्ले करीत आहेत.


Categories

Recent Posts