Breaking
Updated: सप्टेंबर 8, 2025
अंबाजोगाई जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelअंबाजोगाई जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
अंबाजोगाई : अल्पवयीन मुलीवर एकतर्फी प्रेमातून जबरदस्ती करणाऱ्या दिपक बळीराम केंद्रे यास येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश डॉ. रचना तेहरा यांनी २० वर्षे सश्रम कारावास आणि पाच हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली. या प्रकरणात सरकार पक्षाचे ॲड. लक्ष्मण फड यांनी भक्कमपणे बाजू मांडत आरोपीस दोषी ठरवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
मिळालेल्या माहितीनुसार, दि. ९ नोव्हेंबर २०२२ रोजी अल्पवयीन मुलगी घरी एकटी असताना दिपकने तिच्या घरात घुसून जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी मुलीने आरडाओरड करून आईस हाक मारली. शेतात काम करणारी आई मुलीकडे धाव घेत असताना दिपक घटनास्थळावरून पसार झाला.
या घटनेबाबत पीडितेच्या आईने धारूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार गुन्हा क्रमांक २७०/२०२२, कलम ३७६ भादंवि तसेच पोक्सो कायद्याअंतर्गत कलम ४, ८ आणि १२ अन्वये गुन्हा दाखल झाला. प्रकरणाचा तपास पीएसआय घोडे यांनी केला. तपासादरम्यान आवश्यक पुरावे गोळा करून दोषारोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात आले.
न्यायालयीन सुनावणीदरम्यान सरकार पक्षातर्फे एकूण सात साक्षीदार तपासण्यात आले. यामध्ये पीडित मुलगी आणि तिच्या आईची साक्ष अत्यंत महत्त्वाची ठरली. बचाव पक्षाकडून एकच साक्षीदार सादर करण्यात आला. सादर पुरावे आणि साक्षी यावर विचार करून न्यायालयाने दिपक केंद्रे याला दोषी ठरवत कठोर शिक्षा सुनावली.
या निकालात ॲड. लक्ष्मण फड यांनी सरकार पक्षाची बाजू काटेकोरपणे मांडत आरोपीस दोषी ठरविण्यात यश मिळवले. न्यायालयाने त्यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून आरोपीस २० वर्षे सश्रम कारावास व दंडाची शिक्षा ठोठावली.