Vivek Sindhu - Latest Marathi News

Breaking

पोक्सो व विनयभंगाच्या दोन वेगवेगळ्या प्रकरणांत आरोपींची निर्दोष मुक्तता

Updated: जानेवारी 24, 2026

By Vivek Sindhu

ॲड. एस.आर. मुंडे यांचा प्रखर युक्तिवाद ठरला निर्णायक

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

ॲड. एस.आर. मुंडे यांचा प्रखर युक्तिवाद ठरला निर्णायक

अंबाजोगाई: येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने दोन स्वतंत्र फौजदारी खटल्यांमध्ये महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. पोक्सो आणि विनयभंगासारखे गंभीर आरोप असलेल्या दोन आरोपींची सबळ पुराव्याअभावी न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. सत्र न्यायाधीश अजितकुमार बी. भसमे यांनी २० जानेवारी २०२६ रोजी हे दोन्ही निकाल सुनावले असून, या प्रकरणांमध्ये बचाव पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरण्यात आला.

पहिल्या प्रकरणात, भीमराव उर्फ बब्बू केशव वाव्हळे यांच्याविरुद्ध विशेष केस क्रमांक ३५/२०२४ अंतर्गत भारतीय दंड विधान संहितेच्या कलम ३५४, ३५४-डी, ४५२ आणि बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक अधिनियम (पोक्सो) कलम १२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर खटल्याच्या सुनावणीदरम्यान सरकार पक्ष आरोपीविरुद्धचे दोषारोप सिद्ध करण्यासाठी पुरेसे पुरावे सादर करू शकला नाही. प्रत्यक्षदर्शी आणि तांत्रिक बाबींचा अभाव पाहता, न्यायालयाने भीमराव वाव्हळे यांना सर्व आरोपांतून मुक्त केले. या कायदेशीर लढाईत भीमराव वाव्हळे यांच्या वतीने विधीज्ज्ञ ॲड. एस. आर. मुंडे यांनी बाजू मांडली. त्यांना या कामात ॲड. एल. आर. देवकते आणि ॲड. जी. टी. शिंदे यांनी सहकार्य केले.

दुसऱ्या एका प्रकरणात, राहुल विठ्ठल गायकवाड यांच्यावर विशेष केस क्रमांक ८९/२०२४ नुसार भारतीय न्याय संहिता कलम ७४, ७५, ३५१(३) आणि पोक्सो कायद्याच्या कलम ८ व १२ अंतर्गत गंभीर स्वरूपाचे आरोप ठेवण्यात आले होते. याही प्रकरणात फिर्यादी पक्षाला आपली बाजू कोर्टात भक्कमपणे मांडता आली नाही. सरकार पक्षाने सादर केलेले पुरावे गुन्ह्याशी सुसंगत न ठरल्यामुळे न्यायाधीश अजितकुमार बी. भसमे यांनी राहुल गायकवाड यांची देखील निर्दोष मुक्तता केली. या खटल्यात राहुल गायकवाड यांच्या वतीने मुख्यत्वे ॲड. आर. एस. डिघोळे यांनी काम पाहिले, तर त्यांना ॲड. एस. आर. मुंडे, ॲड. एस. ए. सोनपीर, ॲड. एल. आर. देवकते आणि ॲड. जी. टी. शिंदे यांनी मोलाचे कायदेशीर सहकार्य केले.

एकाच दिवशी लागलेल्या या दोन महत्त्वपूर्ण निकालांमुळे न्यायालयीन वर्तुळात चर्चा सुरू आहे. पुराव्यांच्या अभावामुळे आरोपींना दिलासा मिळाला असून, दोन्ही प्रकरणांच्या यशस्वी निकालात ॲड. एस. आर. मुंडे यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरली आहे.


Categories

Recent Posts