Breaking
Updated: जून 18, 2026
पाईपलाईनच्या वादातून अपंग शेतकऱ्यासह कुटुंबावर कुऱ्हाडीने जीवघेणा हल्ला
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelपरळी: तालुक्यातील वाघाळा शिवारात शेतातील पाईपलाईनच्या तोडफोडीच्या कारणावरून झालेल्या वादातून एका अपंग शेतकऱ्यासह त्यांच्या मुला-मुलीवर कुऱ्हाड आणि लाकडी दांड्याने भीषण हल्ला करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना १३ जून रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास घडली असून, याप्रकरणी १७ जून रोजी रात्री परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात ८ जणांविरुद्ध बेकायदेशीर जमाव जमवून प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हरीशचंद्र आश्रुबा सलगर (वय ४७, व्यवसाय शेती) यांच्या शेतातील पाईपलाईनच्या तुटीच्या कारणावरून गावातीलच आरोपी चंद्रकांत सलगर, एकनाथ सलगर, नवनाथ सलगर, जनक सलगर, माणिक सलगर, रावसाहेब सलगर, ज्ञानबा ऊर्फ भाऊ नवनाथ सलगर आणि अनिता चंद्रकांत सलगर यांनी बेकायदेशीर मंडळी जमवून वाद घातला. या वादाचे रूपांतर पुढे गंभीर हाणामारीत झाले. आरोपींनी संगणमत करून फिर्यादी हरीशचंद्र हे अपंग आहेत हे माहिती असूनही त्यांना आणि त्यांच्या मुलीला अमानुष मारहाण केली. तसेच फिर्यादीच्या मुलावर कुऱ्हाडीने सपासप वार करून त्याला गंभीर जखमी केले. आरोपींनी संपूर्ण कुटुंबाला अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू असल्यामुळे फिर्याद देण्यास विलंब झाला असून सहाय्यक फौजदार उबाळे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.