Breaking

अंबाजोगाईत वाहतूक नियमभंग करणाऱ्यांवर पोलिसांची मोठी कारवाई; तब्बल ५० वाहनांवर कायदेशीर बडगा, ३० वाहने जप्त

Updated: जून 17, 2026

By Vivek Sindhu

WhatsApp Image 2026 06 17 at 9.40.21 PM

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

अंबाजोगाई: शहरात वाढत्या वाहतूक कोंडीला आळा घालण्यासाठी आणि बेशिस्त वाहनधारकांना शिस्त लावण्यासाठी अंबाजोगाई शहर पोलिसांनी आज सायंकाळी सव्वासात ते रात्री नऊ वाजेच्या सुमारास एक मोठी धडक मोहीम राबवली. सहाय्यक पोलीस अधीक्षक ऋषिकेश शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत शहरातील गजबजलेल्या तथागत चौक आणि बसस्थानक परिसरात ही विशेष वाहतूक मोहीम राबविण्यात आली. या कारवाईदरम्यान रस्त्यावर अस्ताव्यस्त वाहने उभी करून वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या एकूण ५० वाहनांवर पोलिसांनी थेट कायदेशीर कारवाई केली असून यामुळे नियमबाह्य पार्किंग करणाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

या विशेष मोहिमेदरम्यान रस्त्यावर वाहतुकीस थेट अडथळा निर्माण करणाऱ्या २० वाहनधारकांवर जागेवरच दंडात्मक कारवाई करण्यात आली. तसेच वारंवार सूचना देऊनही तथागत चौकातील हॉटेलसमोर रस्त्यावर अत्यंत अव्यवस्थितपणे पार्किंग करण्यात आलेली आढळून आल्याने एकूण ३० वाहने पोलिसांनी थेट ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणली आणि त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली. या धडक कारवाईमध्ये सहाय्यक पोलीस अधीक्षक ऋषिकेश शिंदे यांच्यासोबत पोलीस निरीक्षक शरद जोगदंड, सहाय्यक पोलीस निरीक्षक ससाने, पोलीस उपनिरीक्षक अनिल शिंदे, रमेश घुले, रमेश सानप आणि भागवत कांदे यांनी प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून मोहीम फत्ते केली. या पथकात पोलीस अंमलदार मंगेश भोळे, श्रीकृष्ण वडकर, बाळासाहेब पारवे, भगवान नागरगोजे, बिभीषण मुंडे, अनिल डोंगरे, निलेश भोसले, तेजस वावळे, हनुमंत लाड, त्र्यंबक फड, अजय गडदे, सुशांत गायकवाड, संदीप मुंडे व उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयातील इतर कर्मचाऱ्यांचा मोठा फौजफाटा सामील झाला होता. शहरातील विविध भागांमध्ये ही विशेष कारवाई दररोज वेगवेगळ्या वेळी आणि बदलत्या ठिकाणी सातत्याने सुरू राहणार असल्याची अधिकृत माहिती पोलीस प्रशासनाकडून देण्यात आली आहे

“खरेदीसाठी अथवा हॉटेलमध्ये जाताना आपली वाहने रस्त्यावर अस्ताव्यस्त उभी न करता नियोजित ठिकाणी किंवा रस्त्याच्या कडेला वाहतुकीस अडथळा होणार नाही अशाच पद्धतीने पार्क करावीत. तसेच हॉटेल चालक व इतर व्यावसायिकांनी आपल्या आस्थापनासमोर ग्राहकांची वाहने शिस्तबद्ध पद्धतीने पार्क करण्याची स्वतंत्र व्यवस्था करावी, जेणेकरून सर्वसामान्य नागरिक, पादचारी आणि प्रवाशांना कोणताही अडथळा निर्माण होणार नाही आणि शहरात शिस्त टिकून राहील.”
-ऋषिकेश शिंदे, सहा. पोलीस अधीक्षक


Categories

Recent Posts