Breaking
Updated: जून 17, 2026
७० वर्षीय महिलेला पोलिसांकडून अटक
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelबीड: शहरातील पेठ बीड पोलीस ठाण्याच्या हद्दीत अमली पदार्थांची विक्री करणाऱ्या एका घरावर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. गांधीनगर येथील शिवसेना कमानीजवळील एका घरात अनधिकृतपणे गांजा बाळगून त्याची विक्री केली जात असल्याची गोपनीय माहिती पेठ बीड पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी १६ जून २०२६ रोजी दुपारी सव्वाचार वाजेच्या सुमारास छापा टाकून ३६ हजार ४४४ रुपये किमतीचा गांजा जप्त केला आहे.
पोलीस निरीक्षक निलेश केळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने आणि नगर परिषदेच्या शासकीय पंचांसमक्ष ही कारवाई केली. संशयित कमलबाई राधाकिसन खंडागळे (वय ७०, रा. गांधीनगर, पेठ बीड) हिच्या घराची झडती घेतली असता, झाडू बनवण्याच्या पानाच्या बंडलमध्ये लपवून ठेवलेला ६ किलो ७४ ग्रॅम निव्वळ गांजा मिळून आला. हा अमली पदार्थ विक्रीच्या उद्देशाने साठवला असल्याने पोलिसांनी तो जागीच सीलबंद केला असून ७० वर्षीय संशयित महिलेला महिला अंमलदारांच्या मदतीने ताब्यात घेतले आहे. आरोपीविरुद्ध गुंगीकारक औषधीद्रव्ये अधिनियम (NDPS Act) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून सहाय्यक पोलीस निरीक्षक नित्यानंद उबाळे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.