Breaking

अग्निवीर जवानाने केला अत्याचार, ४ लाख उकळून लग्नास नकार; पीडितेची इच्छामरणाची मागणी

Updated: जून 17, 2026

By Vivek Sindhu

अग्निवीर जवानाने केला अत्याचार, ४ लाख उकळून लग्नास नकार; पीडितेची इच्छामरणाची मागणी!

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

बीड/परळी : लग्नाची जय्यत तयारी झाली होती, बस्ता बांधून निमंत्रण पत्रिकाही वाटल्या गेल्या होत्या. ६ मे २०२६ रोजी मंगलाष्टकांचे सूर घुमणार होते; परंतु ऐनवेळी नवरदेवाने एका २४ वर्षीय निष्पाप तरुणीचे आयुष्य उद्ध्वस्त झाले. लग्न करण्याचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार केल्याची आणि ४ लाख रुपयांना फसवणूक केल्याची धक्कादायक घटना परळी तालुक्यात उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे, या घटनेतील मुख्य आरोपी हा भारतीय सैन्यात ‘अग्निवीर’ म्हणून कार्यरत असलेला भरत चंद्रकांत तोंडे (रा. सोनीमोहा, ता. धारूर) हा आहे. आता महिना उलटूनही एकाही आरोपीस अटक नसल्याने पीडितेने थेट इच्छामरणाची परवानगी मागितली आहे.

भरत तोंडे याने पीडित तरुणीसोबत लग्न करण्याचे ठरवले होते. मुलीचा विश्वास संपादन करण्यासाठी त्याने आपल्या आई-वडिलांसह नातेवाइकांनाही मध्यस्थी करायला लावले होते. २० डिसेंबर २०२४ रोजी तो पीडितेच्या गावी गेला आणि “माझ्या आई-वडिलांनी तुला तातडीने भेटायला बोलावले आहे,” असे खोटे सांगून तिला गाडीवर बसवले. तिथून तो तिला वडवणीजवळील एका लॉजवर घेऊन गेला. आपण लग्न करणारच आहोत, असे सांगून त्याने तिच्यावर जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. त्यानंतर दोन्ही कुटुंबांच्या संमतीने ६ मे २०२६ ही लग्नाची तारीख निश्चित करण्यात आली होती.

*४ लाख रुपये उकळले अन् दिली उघड धमकी*

लग्नाची तयारी सुरू असताना, “घराचे बांधकाम सुरू आहे” असे कारण सांगून भरतने पीडितेच्या वडिलांकडून चक्क ४ लाख रुपये उकळले. मात्र, २१ एप्रिल २०२६ रोजी भरतने अचानक पीडितेला फोन करून, “मला तुझ्याशी लग्न करायचे नाही, काय करायचे ते कर” अशी उघड धमकी दिली. एवढेच नव्हे, तर फोन करून त्रास दिल्यास “तुला जगू देणार नाही,” असा धाकही दाखवला. हताश झालेल्या पीडितेने परळी ग्रामीण पोलिस ठाण्यात धाव घेतली. तब्बल ५ दिवसांच्या सततच्या पाठपुराव्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. या प्रकरणात मुख्य आरोपी भरत चंद्रकांत तोंडेसह कासाबाई तोंडे, चंद्रकांत तोंडे, शिवकन्या मुंडे, दत्ता मुंडे, पवन तोंडे, सुशेन बडे, वनिता भांगे, उत्रेश्वर घोळवे, सचिन फड आणि विकास तोंडे अशा एकूण ११ जणांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

*मुख्यमंत्र्यांना घातली आर्त साद*

गुन्हा दाखल होऊन महिना उलटला, तरीही राजकीय दबावापोटी परळी पोलिस आरोपींना अटक करण्यास टाळाटाळ करत असल्याचा गंभीर आरोप पीडितेने केला आहे. पोलिस अधीक्षक कार्यालयाचे उंबरठे झिजवून थकलेल्या या पीडित तरुणीने शेवटी ५ जून २०२६ रोजी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत थेट मुख्यमंत्र्यांकडे, “मला न्याय द्या, अन्यथा इच्छामरणाची परवानगी द्या” अशी आर्त साद घातली आहे.


Categories

Recent Posts