Breaking

बीड जिल्ह्यात असंघटीत क्षेत्र आणि श्रमशक्ती सर्वेक्षणाचा शुभारंभ

Updated: जून 15, 2026

By Vivek Sindhu

सर्वेक्षणाला सकारात्मक प्रतिसाद देत राष्ट्रीय कार्यात योगदान द्यावे

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

सर्वेक्षणाला सकारात्मक प्रतिसाद देत राष्ट्रीय कार्यात योगदान द्यावे -जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन

बीड – जिल्ह्यात शासनाच्या अर्थ व सांख्यिकी आयुक्तालयाकडून असंघटीत क्षेत्रातील उद्यमांचे वार्षिक सर्वेक्षण आणि नियतकालिक श्रमशक्ती सर्वेक्षण जून ते डिसेंबर 2026 या कालावधीत आयोजित करण्यात आले आहे. नागरिकांनी प्रगणकाला दिलेली माहिती पूर्णपणे सुरक्षित आणि गोपनीय ठेवली जाणार आहे. या माहितीचा वापर केवळ सांख्यिकी निर्देशांक काढण्यासाठीच केला जाईल. तरी जिल्ह्यातील नागरिकांनी मनात कोणतीही भीती न बाळगता प्रगणकाला खरी व अचूक माहिती द्यावी. तसेच जिल्हावासियांनी या सर्वेक्षणाला सकारात्मक प्रतिसाद देऊन या राष्ट्रीय कार्यात आपले योगदान द्यावे. असे आवाहन जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयात असंघटीत क्षेत्रातील उद्यमांचे वार्षिक सर्वेक्षण व नियतकालिक श्रमशक्ती सर्वेक्षणाचा शुभारंभ आज जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या हस्ते व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहेमान प्रमुख उपस्थित करण्यात आला. यावेळी जिल्हा नियोजन अधिकारी शिला मिसाळ, जिल्हा सांख्यिकी कार्यालयाचे उपायुक्त सुधाकर जाधव, सहायक जिल्हा नियोजन अधिकारी राधाकिशन इगारे यांच्यासह संबंधित यंत्रणचे अधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन म्हणाले, जिल्ह्यातीन अचूक माहिती समोर यावी यासाठी विज्ञानाचा आधार घेत नमुना निवड पद्धतीचा वापर करण्यात आला आहे. यामध्ये नागरी भागातील 78 आणि ग्रामीण भागातील 42 अशा एकूण 120 घटकांची निवड करण्यात आली आहे. या निवडक क्षेत्रांमध्ये प्रशासनाचे प्रगणक घराघरांमध्ये आणि आस्थापनांमध्ये जाऊन थेट माहिती संकलित करणार आहेत. या सर्व्हेक्षणातून बीड जिल्ह्यातील बेरोजगारीचा दर, रोजगार उपलब्धता, आणि महिला कामगारांची संख्या, असंघटीत क्षेत्रातील आस्थापनामधून निर्माण होणारे रोजगार व त्यांच्या उत्पादने आदिची माहिती संकलित करण्यात येणार आहे. या सर्वेक्षणातून गोळा होणाऱ्या आकडेवारीचा सर्वात मोठा फायदा बीड जिल्ह्याचा सकल घरगुती उत्पादन म्हणजेच जीडीपी काढण्यासाठी होणार आहे. जिल्ह्याच्या विकासाचे खरे चित्र आणि भविष्यातील योजनांचे नियोजन याच आकडेवारीवर अवलंबून असेल, असेही त्यांनी सांगितले.

केंद्र शासनाच्या NSSO मार्फत देशपातळीवर घेतले जाणारे नियतकालिक श्रमशक्ती सर्वेक्षण आणि असंघटीत क्षेत्रातील उद्यमांचे वार्षिक सर्वेक्षण हे दोन्ही सर्व्हे यावर्षी प्रथमच महाराष्ट्र शासनाच्या अर्थ व सांख्यिकी आयुक्तालयामार्फत राज्यस्तरावर आयोजित केले जात आहेत. पूर्वी सॅम्पल साईज लहान असल्यामुळे निष्कर्षांच्या अचूकतेवर मर्यादा होत्या. ही बाब लक्षात घेऊन, राज्याचे मुख्य आर्थिक सल्लागार प्रवीण परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. यातील सर्व्हेक्षणामुळे जिल्ह्यातील बेरोजगारीचा दर, उपलब्ध रोजगार आणि महिला कामगारांची संख्या समजेल. तसेच असंघटित व अनोंदणीकृत क्षेत्रातील आस्थापनांची माहिती गोळा केली जाईल. या असंघटित क्षेत्राचा देशाच्या अर्थव्यवस्थेत मोठा वाटा असूनही त्यांचे मोजमाप होत नव्हते. आता या सर्व्हेमुळे गोळा होणाऱ्या डेटाच्या आधारे जिल्हास्तरावर अचूक जीडीपी काढणे शक्य होणार आहे.अशी माहिती जिल्हा सांख्यिकी कार्यालयाचे उपायुक्त सुधाकर जाधव यांनी दिली.


Categories

Recent Posts