Breaking

६ लाख ४० हजारांची लाच घेताना अंबडच्या तहसीलदाराला रंगेहाथ पकडले; बीड ‘एसीबी’ची कारवाई

Updated: जून 6, 2026

By Vivek Sindhu

६ लाख ४० हजारांची लाच घेताना अंबडच्या तहसीलदाराला रंगेहाथ पकडले; बीड ‘एसीबी’ची कारवाई

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

जालना: जिल्ह्यातील अंबडचा तहसीलदार विजय चव्हाण याला सहा लाख चाळीस हजार रुपयांची लाच स्वीकारताना बीड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात अटक केली. गोदावरी नदीपात्रातील वाळू उत्खननासाठी पोकलेन मशीन आणि ट्रक विनाअडथळा सुरू ठेवण्याच्या मोबदल्यात ही लाच मागण्यात आली होती. या धडक कारवाईमुळे जालना आणि बीड जिल्ह्याच्या प्रशासकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.

या प्रकरणी तक्रारदाराने बीड एसीबीकडे धाव घेऊन तक्रार नोंदवली होती. तक्रारीची शहानिशा केल्यानंतर बीड एसीबीच्या पथकाने छत्रपती संभाजीनगर येथील तहसीलदार विजय चव्हाण, वय ५२ वर्षे, राहणार छत्रपती संभाजीनगर याच्या राहत्या घरी सापळा रचला. ठरलेल्या तडजोडीनुसार ६ लाख ४० हजार रुपयांची लाचेची रक्कम स्वीकारताच दबा धरून बसलेल्या पथकाने चव्हाण याला रंगेहात ताब्यात घेतले. शासकीय पदाचा गैरवापर करून खासगी व्यक्तींच्या मदतीने बेकायदेशीर वसुली केल्याचा प्रकार या कारवाईतून समोर आला आहे.

या प्रकरणी छत्रपती संभाजीनगर येथील सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग बीडचे पोलीस उपअधीक्षक आणि त्यांच्या विशेष पथकाने ही यशस्वी कारवाई केली. एसीबीचे वरिष्ठ अधिकारी या संपूर्ण प्रकरणाचा पुढील तपास करत असून आरोपीच्या मालमत्तेची देखील चौकशी केली जाण्याची शक्यता आहे.


Categories

Recent Posts