Breaking
Updated: जून 5, 2026
पावणेआठ लाखांचा प्रतिबंधित गुटखा आणि वाहन जप्त
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelअंबाजोगाई शहर पोलीस स्टेशनच्या पथकाने परळी वेस परिसरात ३ जून २०२६ रोजी एका गोपनीय माहितीच्या आधारे मोठी कारवाई केली. या कारवाईत महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला तब्बल ३ लाख ४० हजार २० रुपये किमतीचा गुटखा, पान मसाला व सुगंधित तंबाखूचा साठा आणि वाहतुकीसाठी वापरण्यात येणारे ४ लाख ५० हजार रुपयांचे चारचाकी वाहन असा एकूण ७ लाख ९० हजार २० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी अंबाजोगाई येथील मोरेवाडी परिसरातील शिक्षक कॉलनी येथे राहणारा २५ वर्षीय आरोपी शशिकांत शिवाजी बुलबुले याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार, अंबाजोगाई शहर पोलिसांना परळी वेस परिसरातून प्रतिबंधित मालाची वाहतूक होणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी पंचांसमक्ष सापळा रचला. संशयास्पद वाटणारे पांढऱ्या रंगाचे चारचाकी वाहन क्रमांक एमएच-४४-बी-२५२९ थांबवून त्याची झडती घेतली असता, त्यात विमल पान मसाला, विडी-१ तंबाखू, प्रीमियम गोवा १००० मसाला, प्रीमियम राज निवास सुगंधी पान मसाला, प्रीमियम झेडएल-०१ जाफरानी जर्दा पान मसाला, डॉक्टर स्पेशल पान मसाला आणि प्रीमियम शॉर्ट लक्झरी सेव्हन टोबॅको पान मसाला अशा विविध प्रकारच्या प्रतिबंधित मालाचा साठा आढळून आला. पोलिसांनी सर्व मुद्देमाल जप्त करून आरोपीला अटक केली आहे.
या प्रकरणी अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात संबंधित कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून सहाय्यक पोलीस निरीक्षक ससाणे या गुन्ह्याचा पुढील तपास करत आहेत. ही धडक कारवाई बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत, प्रभारी पोलीस अधीक्षक चेतना, सहाय्यक पोलीस अधीक्षक ऋषिकेश शिंदे, अंबाजोगाईचे पोलीस निरीक्षक शरद जोगदंड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक ससाणे, पोलीस उपनिरीक्षक आनंद शिंदे, पोलीस हवालदार नागरगोजे, पोलीस नाईक तेजस वावळे, पोलीस अंमलदार राठोड, पोलीस शिपाई हनुमंत चादर आणि सुशांत गायकवाड यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.