Breaking

हुंड्यासाठी छळवणूक! गेवराईत दोन विवाहितांची गळफास घेऊन आत्महत्या; सासरच्यांवर गुन्हे दाखल

Updated: जून 3, 2026

By Vivek Sindhu

केज येथे दोन टेम्पोच्या २० हजाराच्या बॅटऱ्या चोरल्या

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

गेवराई: हुंड्याची मागणी आणि सासरच्या लोकांकडून होणाऱ्या सततच्या त्रासाला कंटाळून दोन विवाहितांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याच्या दोन वेगवेगळ्या धक्कादायक घटना खांडवी आणि गेवराई शहरात समोर आल्या आहेत. या दोन्ही प्रकरणात विवाहितांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रमाण सासरच्या मंडळींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पहिली घटना खांडवी येथे घडली. फिर्यादी विठ्ठल आबासाहेब कदम (वय ४४, रा. डुब्बा थडी, ता. माजलगाव) यांची १९ वर्षीय मुलगी ऋतुजा हिचा विवाह खांडवी येथील गणेश श्रीकिसन नाईकवाडे याच्याशी झाला होता. लग्नानंतर सुरुवातीचे काही महिने चांगले गेल्यानंतर नवरा गणेश आणि जाऊ सोनाली ज्ञानेश्वर नाईकवाडे (रा. आळंदी फाटा, पुणे) यांनी किरकोळ कारणावरून ऋतुजाला मारहाण करणे व उपाशी ठेवणे सुरू केले. तसेच माहेरहून एक लाख रुपये घेऊन येण्यासाठी तिचा शारीरिक व मानसिक छळ केला. या त्रासाला कंटाळून ऋतुजाने लोखंडी आदूला गळफास लावून आपली जीवनयात्रा संपवली.

दुसरी घटना गेवराई शहरात घडली. फिर्यादी आकाश संजय काळे (वय २३, रा. परभणी) यांची २० वर्षीय बहीण पूजा हिचा विवाह गेवराई येथील प्रमोद साईनाथ सुरवसे याच्यासोबत झाला होता. लग्नानंतर व्यवसायासाठी आणि कार खरेदीसाठी सासरच्यांनी वेळोवेळी पैशांची मागणी केली. काळे परिवाराने सात लाख रुपये दिले, तरीही सासरच्यांचे समाधान झाले नाही. आणखी तीन लाख रुपयांची मागणी करत नवरा प्रमोद, सासू उषाबाई, सासरे साईनाथ बापुराव सुरवसे, दीर गणेश सुरवसे, जाऊ आरती सुरवसे आणि नणंद अर्चना तुळसे (रा. छत्रपती संभाजीनगर) यांनी पूजाचा मानसिक व शारीरिक छळ केला. या जाचाला कंटाळून पूजाने राहत्या घरी फाशी घेऊन आत्महत्या केली.

या दोन्ही संवेदनशील घटनांसंबंधी गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पहिल्या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रामदास बाळासाहेब खोत करत आहेत, तर दुसऱ्या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक संजय मनोहर उदगीरकर यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.


Categories

Recent Posts