Breaking
Updated: जून 3, 2026
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelअंबाजोगाई: सोन्याचे बिस्कीट देण्याचे खोटे आमिष दाखवून एका ६५ वर्षीय वृद्धेची फसवणूक करत गळ्यातील सोन्याची चैन आणि रोख रक्कम लुटल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दोन अज्ञात भामट्यांनी संगणमताने वृद्धेला भुरळ पाडून तब्बल एक लाख दोन हजार रुपयांचा ऐवज लांबवला. याप्रकरणी अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भिमनगर परळीवेस येथील रहिवासी सुमनबाई मधुकर कांबळे (वय ६५ वर्ष, व्यवसाय घरकाम) या बँकेचे काम संपवून शिवाजी चौकातून घराकडे निघाल्या होत्या. त्या रिक्षाकडे जात असताना रस्त्यात दोन अनोळखी इसम त्यांच्याजवळ आले. एकाने रस्त्यावर गुलाबी कागद टाकून निघून जाण्याचे नाटक केले, तर दुसऱ्याने त्या कागदात काहीतरी मौल्यवान असल्याचा बहाणा करत सुमनबाईंना पंचायत समितीजवळील रस्त्यावर नेले.
तिथे दोघांनी सोन्याचे बिस्कीट देतो असे आमिष दाखवून सुमनबाईंना भुरळ पाडली आणि त्यांच्या गळ्यातील १ लाख रुपये किमतीची सव्वा तोळ्याची सोन्याची चैन व दोन हजार रुपयांची रोकड काढून घेतली. त्या बदल्यात भामट्यांनी त्यांना गुलाबी कागदात गुंडाळलेले खोटे बिस्कीट देऊन पळ काढला. सुमनबाईंनी घरी जाऊन पाहणी केली असता फसवणूक झाल्याचे उघड झाले.
याप्रकरणी अज्ञात दोन आरोपींविरुद्ध अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेनुसार चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार तेजस बालाजी वाव्हळे करत आहेत.