Breaking

खरीप हंगाम तयारी व प्रमुख पिकांच्या तंत्रज्ञान प्रसारासाठी कोपरा येथे प्रशिक्षण मोहिम संपन्न

Updated: मे 26, 2026

By Vivek Sindhu

खरीप हंगाम तयारी व प्रमुख पिकांच्या तंत्रज्ञान प्रसारासाठी कोपरा येथे प्रशिक्षण मोहिम संपन्न.

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

एनडीकेएसपी अंतर्गत कोपरा येथे हवामान अनुकूल शेती तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षिक

अंबाजोगाई – खरीप हंगाम अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्याने शेतकऱ्यांकडून मशागत, खते व बियाणे खरेदीची लगबग सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर कृषि विभागाकडून शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन हवामान बदलाच्या परिस्थितीत सुरक्षित व समृद्ध शेतीसाठी आवश्यक आधुनिक कृषितंत्रज्ञानाचे मार्गदर्शन केले जात आहे.

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (एनडीकेएसपी) अंतर्गत हवामान अनुकूल तंत्रज्ञान (सीआरटी) प्रात्यक्षिक मोहिमेअंतर्गत कोपरा येथे बियाणे उगवण क्षमता तपासणी व बीजप्रक्रिया प्रशिक्षण कार्यक्रम उत्साहात पार पडला. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुभाष साळवे व उपविभागीय कृषी अधिकारी राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या कार्यक्रमात शेतकऱ्यांनी बदलत्या हवामानानुसार आधुनिक तंत्रज्ञान स्वीकारण्याचा निर्धार व्यक्त केला.

यावेळी तालुका कृषी अधिकारी विजयकुमार पवार यांनी एल निनोच्या परिणामांविषयी सविस्तर माहिती दिली. एल निनो सक्रिय झाल्यास भारतात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता वाढून दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण होऊ शकते, असे त्यांनी सांगितले. पॅसिफिक महासागरातील विषुववृत्ताजवळील मध्य व पूर्व भागातील समुद्राच्या पाण्याचे तापमान वाढल्याने जागतिक हवामान पद्धतीत बदल होतो, याकडे त्यांनी लक्ष वेधले. खरीप हंगाम तसेच ऊस पिकावर विपरीत परिणाम टाळण्यासाठी खत व पाण्याचा कार्यक्षम वापर करण्यासाठी ठिबक सिंचन पद्धतीचा अवलंब करण्याचे आवाहन त्यांनी केले.

उपविभागीय तंत्रज्ञान समन्वयक शिवप्रसाद येळकर यांनी अलनिनोच्या पार्श्वभूमीवर कमी ते मध्यम कालावधीत तयार होणाऱ्या जेएस-९३०५, एमएयुएस-७१, एमएसयूएस-१५८, एमएयुएस-६१२ व केडीएस-९९२ या सोयाबीन वाणांची निवड करण्याचा सल्ला दिला. सोयाबीन बीजप्रक्रियेसाठी अझॉक्सिस्ट्रोबिन २.५ टक्के अधिक थायोफिनेट मिथाईल ११.२५ टक्के अधिक थायामेथोक्सम २५ टक्के एफएस या औषधाचा वापर करण्याबरोबरच पर्यायी बुरशीनाशके, थायामेथोक्साम ३० टक्के एफएस, ब्रेडीरायझोबियम जापोनिकम व स्फुरद विरघळविणारे जिवाणू संवर्धक यांच्या वापराबाबत मार्गदर्शन केले. रासायनिक प्रक्रिया पेरणीपूर्वी चार ते पाच दिवस आधी, तर जिवाणू संवर्धक प्रक्रिया पेरणीच्या अर्धा तास आधी करावी, असे त्यांनी सांगितले.

हुमणी अळीच्या प्रादुर्भावामुळे यापूर्वी सोयाबीन व ऊस पिकांचे झालेल्या नुकसानाची उदाहरणे दाखवून या किडीच्या प्रौढ अवस्था व्यवस्थापनासाठी एरंड सापळे व प्रकाश सापळे उभारण्याचे महत्त्व स्पष्ट करण्यात आले. ऊस पिकातील चाबूक काणी रोग व्यवस्थापनासाठी बाधित बेटे उपटून नष्ट करावीत तसेच ॲझॉक्सीस्ट्रॉबीन १८.२ टक्के अधिक डायफेनोकोनाझोल ११.४ टक्के एससी या संयुक्त बुरशीनाशकाची १० मिली प्रति १० लिटर पाण्यात फवारणी करावी, असे मार्गदर्शन करण्यात आले.

उन्हाळी ताण सहनशक्ती वाढविण्यासाठी १३:००:४५ या विद्राव्य खताची ५ ग्रॅम प्रति लिटर पाणी तसेच व्हीएसआय निर्मित ‘वसंत ऊर्जा’ ५ मिली प्रति लिटर पाण्यातून फवारणी करण्याचा सल्लाही देण्यात आला. फुले २६५ ऊस जातीच्या संकरातून विकसित झालेल्या ऊस जातीमध्ये तांबेरा व पानांवरील तपकिरी ठिपके या बुरशीजन्य रोगांच्या व्यवस्थापनासाठी मॅन्कोझेब ३ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी, अशी माहिती येळकर यांनी दिली.

बेस्ट ॲग्रो कंपनीचे प्रतिनिधी रामेश्वर शेजुळ, शिनगारे व आदामा कंपनीचे कुणाल गडड यांनी सोयाबीन बीजप्रक्रियेचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक सादर केले. सहाय्यक कृषी अधिकारी पंडित काकडे यांनी बियाणे उगवण क्षमतेचे महत्त्व स्पष्ट करून बिजोत्पादन घटकाचा लाभ घेण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमास बालाजी देशमुख, मनोज देशमुख, राम देशमुख, साहेबराव देशमुख, विनायक देशमुख यांच्यासह परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Categories

Recent Posts