Breaking
Updated: मे 21, 2026
अंबाजोगाईचे ज्येष्ठ विधीज्ञ आणि सामाजिक सलोख्याचे दूत ॲड. मीर फरकुंद अली यांचे निधन; शहरावर शोककळा
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelअंबाजोगाई: शहराच्या सामाजिक आणि राजकीय जडणघडणीत अत्यंत महत्त्वाचे योगदान देणारे ज्येष्ठ विधीज्ञ आणि सर्वपक्षीय स्नेहाचे प्रतीक ॲड. मीर फरकुंद अली यांचे आज पहाटे ५:३० वाजता वृद्धापकाळाने निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय ९१ वर्षे होते. त्यांच्या पश्चात मोठा परिवार आणि विस्तीर्ण मित्रपरिवार आहे. आज पहाटे त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच संपूर्ण अंबाजोगाई शहर आणि परिसरात तीव्र शोककळा पसरली असून, शहराने ‘गंगाजमनी तहजीब’ (हिंदू-मुस्लिम सलोखा) जोपासणारा एक मार्गदर्शक आणि सच्चा नेता गमावला असल्याची भावना सर्व स्तरांतून व्यक्त होत आहे.
मूळचे सायगाव येथील रहिवासी असलेले ॲड. मीर फरकुंद अली हे शालेय जीवनापासूनच अत्यंत हुशार विद्यार्थी होते. त्यांनी हैदराबाद येथील प्रसिद्ध उस्मानिया विद्यापीठातून कायद्याची पदवी घेतली आणि त्यानंतर वकिली व्यवसायासाठी अंबाजोगाई शहराची निवड केली. स्वातंत्र्यपूर्व काळ आणि त्यानंतरची निजाम राजवट या दोन्ही ऐतिहासिक कालखंडांचे ते साक्षीदार होते. अंबाजोगाईची मिश्र लोकसंख्या लक्षात घेता, शहरात शांतता आणि सौहार्द टिकून राहण्यासाठी ‘गंगाजमनी तहजीब’ रुजणे गरजेचे आहे, हे त्यांनी ओळखले होते. यासाठी त्यांनी समकालीन सर्वधर्मीय नेत्यांच्या खांद्याला खांदा लावून जवळपास सहा ते सात दशके सामाजिक सलोख्यासाठी मोलाचे कार्य केले.
ॲड. मीर फरकुंद अली यांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी कधीही कोणत्याही राजकीय पक्षाचे अधिकृत पद घेतले नाही किंवा सक्रीय राजकारणात प्रवेश केला नाही. तरीही, त्यांच्या प्रगल्भ विचारांमुळे आणि समाजावरील पकडीमुळे सर्वपक्षीय नेत्यांशी त्यांचे अतिशय घनिष्ठ व सौहार्दाचे संबंध होते. अंबाजोगाई नगरपालिकेच्या वॉर्ड निवडणुकीपासून ते लोकसभेच्या निवडणुकीपर्यंत पडद्यामागून सूत्रे हलवण्यात आणि योग्य उमेदवाराला विजयी करण्यात त्यांचा शब्द अंतिम मानला जात असे. जवळपास चार दशके त्यांनी स्थानिक राजकारणावर आपला अदृश्य पण तितकाच भक्कम प्रभाव कायम ठेवला होता.
अलिकडच्या काळात ते वृद्धापकाळाशी संबंधित आजारांनी त्रस्त होते, तरीही त्यांची स्मरणशक्ती आणि उत्साह कायम होता. काल रात्री नेहमीप्रमाणे जेवण करून आणि कुटुंबीयांशी गप्पा मारून ते झोपले, मात्र पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाने बीड जिल्ह्यातील मुस्लिम समाजाचा एक प्रगल्भ चेहरा आणि अंबाजोगाईच्या सामाजिक ऐक्याचा एक मुख्य आधारस्तंभ निखळला आहे. शुक्रवारी दुपारची नमाज अदा झाल्यानंतर नुरानी मस्जिद येथे दफनविधी करण्यात अयेणार आहे. ॲड. मीर फरकुंद अली यांच्या कुटुंबियांच्या दु:खात विवेक सिंधु परिवार सामील आहे.