Breaking

ट्रॅव्हल्स गतिरोधकावर जोरात आदळली; दरवाजा उघडून प्रवासी खाली पडला, चाकाखाली चिरडून मृत्यू

Updated: मे 12, 2026

By Vivek Sindhu

दरवाजा उघडून प्रवासी खाली पडला, चाकाखाली चिरडून मृत्यू

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

शिरूर कासार: तालुक्यातील मानूर शिवारात सोमवारी मध्यरात्री एक विचित्र अपघात झाला असून यामध्ये लातूर येथील एका प्रवाशाचा जागीच मृत्यू झाला आहे. भरधाव वेगाने जाणारी चौधरी ट्रॅव्हल्स गतिरोधकावर जोरात आदळल्याने दरवाज्याजवळ बसलेला प्रवासी खाली पडला आणि बसच्या मागील टायरखाली चिरडला गेल्याने ही दुर्दैवी घटना घडली. याप्रकरणी शिरूर कासार पोलीस ठाण्यात बस चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, लातूर येथील रहिवासी असलेले काशिनाथ महादेव बरिदे (वय ४० वर्षे) हे लातूर ते नाशिक असा प्रवास ‘चौधरी ट्रॅव्हल्स’च्या (क्रमांक एम एच २४ एफ ८००८) गाडीने करत होते. ११ मे २०२६ रोजी रात्री दीड वाजेच्या सुमारास ही बस मानूर शिवारातील गतिरोधकावर आली असता, चालक सादिक खाजोद्दीन सय्यद याने गाडीचा वेग कमी न करता ती जोरात गतिरोधकावरून नेली. या भीषण धक्क्यामुळे ट्रॅव्हल्सचा दरवाजा अचानक उघडला गेला आणि क्लिनर सीटजवळ बसलेले काशिनाथ बरिदे थेट खाली रस्त्यावर पडले. दुर्दैवाने त्याच ट्रॅव्हल्सचे मागील चाक त्यांच्या डोक्यावरून आणि पायावरून गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृत काशिनाथ यांचे बंधू सचिन बरिदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चालक सादिक खाजोद्दीन सय्यद याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चालकाने आपले वाहन निष्काळजीपणाने आणि भरधाव वेगाने चालवून प्रवाशाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा ठपका त्याच्यावर ठेवण्यात आला आहे. पोलीस हवालदार तांदळे या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.


Categories

Recent Posts