Breaking
Updated: मे 6, 2026
जुना वादातून केजच्या सुर्डी फाटा येथे भरदिवसा हत्या; आरोपीला तासाभरात बेड्या
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelकेज: तालुक्यातील सुर्डी फाटा येथे जुन्या वादातून एका व्यक्तीची लाकडी काठीने मारहाण करून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना ५ मे रोजी दुपारी घडली. खुशालराम बलभीम ठोंबरे (रा. सुर्डी) असे मृताचे नाव असून, याप्रकरणी युसूफ वडगाव पोलिसांनी वेगाने चक्रे फिरवत आरोपीला अवघ्या एका तासात बेड्या ठोकल्या आहेत. कौटुंबिक वादाचा राग मनात धरून ही हत्या करण्यात आल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मृत खुशालराम ठोंबरे हे मंगळवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास सुर्डी फाटा येथील एका वडापावच्या दुकानात बसलेले होते. यावेळी आरोपी मंगेश भारत माने याने कुटुंबाला केलेल्या शिवीगाळीचा आणि जुन्या वादाचा राग मनात धरून खुशालराम यांच्यावर लाकडी काठीने हल्ला चढवला. या भीषण मारहाणीत गंभीर जखमी झाल्याने खुशालराम यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
घटनेनंतर मृताचा मुलगा बालाजी खुशालराम ठोंबरे यांनी युसूफ वडगाव पोलीस ठाण्यात समक्ष हजर होऊन फिर्याद दिली. या फिर्यादीवरून आरोपी मंगेश भारत माने (वय २९ वर्ष, रा. सुर्डी) याच्याविरुद्ध युसूफ वडगाव पोलीस ठाण्यात गु. र. क्र. १२४/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता कलम १०३ (१) अन्वये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्हा दाखल होताच युसूफ वडगाव पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक मच्छिंद्रनाथ शेंडगे यांनी तपासाची चक्रे फिरवली. तांत्रिक तपास आणि गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी कुंभेफळ परिसरात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी तातडीने या परिसरात पाठलाग करून गुन्हा नोंद झाल्यापासून अवघ्या एका तासाच्या आत आरोपी मंगेश माने याला ताब्यात घेतले.
ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, अपर पोलीस अधीक्षक चेतना तिडके आणि सहाय्यक पोलीस अधीक्षक व्यंकटराम यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक मच्छिंद्रनाथ शेंडगे, पोलीस हवालदार अनिल बिक्कड, सीताराम डोंगरे, संपत शेंडगे आणि सोहेल पठाण यांच्या पथकाने केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस प्रशासन करत आहे.