Breaking

माजी सैनिक कमलाकर मलवाड यांना राज्यस्तरीय ‘सैनिक रत्न’ पुरस्कार जाहीर

Updated: मे 5, 2026

By Vivek Sindhu

सीमेवरील शौर्यापासून ते सहकारापर्यंतच्या चतुरस्त्र कार्याचा गौरव

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

सीमेवरील शौर्यापासून ते सहकारापर्यंतच्या चतुरस्त्र कार्याचा गौरव

अंबाजोगाई: भारतीय लष्करातील प्रदीर्घ सेवा आणि सेवानिवृत्तीनंतर समाजकार्य तसेच सहकार क्षेत्रात दिलेल्या अतुलनीय योगदानाची दखल घेत अंबाजोगाई तालुक्यातील गित्ता येथील सुपुत्र तथा सैनिक फेडरेशनचे तालुकाध्यक्ष हवालदार कमलाकर ज्ञानोबा मलवाड यांना राज्यस्तरीय ‘सैनिक रत्न’ पुरस्कार जाहीर झाला आहे. सैनिक फेडरेशन महाराष्ट्र राज्याच्या वतीने या गौरवशाली पुरस्काराची घोषणा करण्यात आली असून, या निवडीमुळे अंबाजोगाईच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

हवालदार कमलाकर मलवाड यांनी १६ जानेवारी १९८० ते ३१ जानेवारी १९९६ या कालावधीत भारतीय थलसेनेच्या आर्टिलरी विभागात तब्बल १६ वर्षे देशसेवा बजावली. आपल्या सेवाकाळात त्यांनी राजस्थान, पंजाब आणि सिक्कीम-चीन यांसारख्या संवेदनशील सीमांवर कर्तव्य पार पाडले. तसेच नागपूर, अलाहाबाद, दिल्ली आणि हैदराबाद येथील लष्करी तळांवरही त्यांनी महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या समर्थपणे पेलल्या आहेत. सीमेवरील कठीण परिस्थितीत देशरक्षणाचे व्रत जोपासल्यानंतर त्यांनी नागरी जीवनातही आदर्श निर्माण केला आहे.

लष्करातील निवृत्तीनंतर मलवाड यांनी १९९८ साली आपल्या मूळ गावी गित्ता येथील पोलीस पाटील म्हणून सूत्रे हाती घेतली. सलग २५ वर्षे म्हणजे २०२३ पर्यंत त्यांनी कोणत्याही राजकीय हस्तक्षेपाशिवाय आणि जातीभेदाशिवाय गावात सलोखा राखण्याचे काम केले. अनेक गुंतागुंतीचे तंटे आणि वाद सामोपचाराने मिटवून त्यांनी गावाला शांततेचा मार्ग दाखवला. सामाजिक व धार्मिक उत्सवांमध्ये त्यांनी ठेवलेली शिस्त गावासाठी आजही मार्गदर्शक ठरते.

सहकार क्षेत्रातही मलवाड यांनी मोठे यश संपादन केले आहे. माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी २००१ मध्ये सुरू करण्यात आलेल्या ‘त्रिदल माजी सैनिक सहकारी पतसंस्था मर्यादित, अंबाजोगाई’ या संस्थेच्या स्थापनेत त्यांचा मोलाचा वाटा आहे. केवळ १० हजार रुपयांच्या भांडवलावर सुरू झालेल्या या संस्थेची उलाढाल ३१ मार्च २०२६ अखेर २५ कोटी रुपयांच्या टप्प्यावर पोहोचली आहे. या संस्थेच्या माध्यमातून अनेक सैनिकांना घरबांधणी, शेती आणि व्यवसायासाठी आर्थिक आधार मिळाला आहे. त्यांच्या या चतुरस्त्र कामगिरीबद्दल सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.


Categories

Recent Posts