Breaking
Updated: मे 5, 2026
दगडाने पोटावर मारून केले जखमी
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelपरळी: परळी तालुक्यातील मांडेखेल शिवारात शेतीतील पाईप लाईन उकरल्याच्या कारणावरून एका ५५ वर्षीय महिलेला दगडाने आणि लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यात महिला गंभीर जखमी झाली असून आरोपींनी तिला जीवे मारण्याची धमकी दिली आहे. याप्रकरणी परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात एकाच कुटुंबातील तिघांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मांडेखेल येथील रहिवासी असलेल्या ५५ वर्षीय शेतकरी शिवनंदा महादेव नागरगोजे १ मे रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास आपल्या शेतात गेल्या होत्या. त्यांच्या शेताच्या बाजूला रस्त्याचे काम सुरू असल्याने आपली पाण्याची पाईप लाईन उकरली आहे का, हे पाहण्यासाठी त्या तिथे पोहोचल्या. तपासणी दरम्यान त्यांची पाईप लाईन त्यांना सापडली. याच वेळी आरोपी परमेश्वर मधुकर नागरगोजे हा तिथे पळत आला आणि त्याने वादाला सुरुवात केली.
तुझीच पाईप लाईन कशी सापडली आणि आमची पाईप लाईन कशी सापडली नाही, असा जाब विचारत परमेश्वर नागरगोजे याने शिवनंदा यांच्याशी हुज्जत घातली. वादाचे रूपांतर काही वेळातच हिंसक वळणात झाले. परमेश्वरने हातातील मोठ्या दगडाने शिवनंदा यांच्या पोटावर जोरदार प्रहार केला. या प्रहारामुळे त्या जमिनीवर कोसळल्या आणि गंभीर जखमी झाल्या. त्यानंतर तिथे असलेल्या आरोपी सुनंदा मधुकर नागरगोजे आणि अश्वीनी परमेश्वर नागरगोजे यांनी शिवनंदा यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. ‘तुला जिवंत सोडणार नाही’ अशी धमकी देऊन आरोपींनी तिथून पळ काढला. या घटनेनंतर जखमी शिवनंदा यांनी पोलीस ठाण्यात धाव घेऊन आपबिती सांगितली. याप्रकरणी परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार कप्पे हे करत आहेत.