Breaking
Updated: एप्रिल 24, 2026
दहाव्याच्या विधीवेळी जाधव कुटुंबाचा संसार आगीत भस्मसात
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelअंबाजोगाई: तालुक्यातील पट्टीवडगाव येथे आज सकाळी साडे नऊच्या सुमारास गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट झाल्याची धक्कादायक घटना घडली असून यात दोन घरे आणि संपूर्ण संसार जळून खाक झाला आहे. बालासाहेब जाधव यांच्या पत्नीच्या निधनानंतर आयोजित दहाव्याच्या विधीसाठी स्वयंपाक सुरू असताना अचानक लागलेल्या आगीमुळे हा अनर्थ ओढवला. या दुर्घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी जाधव कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, पट्टीवडगाव येथील रहिवासी बालासाहेब जाधव यांच्या पत्नी पार्वतीबाई जाधव यांचे १२ एप्रिल २०२६ रोजी कर्करोगामुळे निधन झाले होते. त्यांच्या निधनानंतरच्या दहाव्याच्या विधीसाठी जाधव यांच्या घरी आज सकाळपासूनच स्वयंपाकाची लगबग सुरू होती. विधीसाठी आलेल्या पाहुण्यांच्या भोजनाची तयारी सुरू असताना सकाळी ९:३० च्या सुमारास स्वयंपाकाच्या भट्ट्याने अचानक पेट घेतला. उपस्थितांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला, मात्र आगीची झळ बसताच भट्ट्याला जोडलेल्या गॅस सिलेंडरचा मोठा स्फोट झाला.
हा स्फोट इतका भीषण होता की त्याचा आवाज संपूर्ण परिसरात ऐकू आला आणि परिसरात एकच खळबळ उडाली. जाधव यांचे घर जुन्या पद्धतीचे आणि लाकडी बांधकामाचे असल्याने आगीने काही क्षणातच रौद्र रूप धारण केले. ही आग इतकी वेगाने पसरली की तिने शेजारील दुसऱ्या घरालाही आपल्या कवेत घेतले. ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पाण्याचा मारा करून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न केले, ज्यामुळे मोठा अनर्थ टळला. मात्र, या भीषण आगीत दोन्ही घरातील धान्य, कपडे, भांडी आणि महत्त्वाची कागदपत्रे जळून कोळसा झाली आहेत.
पत्नी गमावल्याच्या शोकात असलेल्या जाधव कुटुंबाचा राहता संसार डोळ्यांदेखत उघड्यावर पडल्याने संपूर्ण गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. या दुर्घटनेमुळे कुटुंबाचे मोठे आर्थिक आणि मानसिक नुकसान झाले आहे. महसूल प्रशासनाने या घटनेची गंभीर दखल घेऊन तातडीने घटनास्थळाचा पंचनामा करावा आणि नुकसानग्रस्त कुटुंबाला शासनाकडून तातडीची आर्थिक मदत मिळवून द्यावी, अशी आग्रही मागणी पट्टीवडगावच्या ग्रामस्थांनी केली आहे.