Breaking

देशसेवेचा समृद्ध वारसा आणि कर्तृत्वाचा गौरवशाली जीवनप्रवास

Updated: एप्रिल 20, 2026

By Vivek Sindhu

माजी सैनिक राजाराम पोतदार यांचा अमृतमहोत्सव

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

माजी सैनिक राजाराम पोतदार यांचा अमृतमहोत्सव

अंबाजोगाई: भारतीय लष्करातील गौरवशाली सेवेनंतर प्रशासकीय क्षेत्रातही आपला ठसा उमटवणारे धाराशिव जिल्ह्यातील पळसप गावचे सुपुत्र राजाराम मुरलीधर पोतदार यांचा ७५ वा वाढदिवस आज २० एप्रिल रोजी साजरा होत आहे. वयाच्या २० व्या वर्षी देशरक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून लष्करात दाखल झालेल्या पोतदार यांनी आपल्या १६ वर्षांच्या कार्यकाळात देशाच्या विविध सीमांवर अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आपली कर्तव्यनिष्ठा सिद्ध केली आहे.

राजाराम पोतदार यांनी १९७१ ते १९८६ या अत्यंत संवेदनशील कालखंडात भारतीय लष्करामध्ये ‘नायक’ पदावर राहून देशाची सेवा केली. या १६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी जबलपूर, आग्रा आणि नागालँड यांसारख्या दुर्गम आणि आव्हानात्मक ठिकाणी आपल्या कर्तव्याचे चोख पालन केले. विशेषतः १९७१ च्या युद्धातील त्यांच्या सहभागाची आणि समर्पित सेवेची दखल घेऊन भारत सरकारकडून त्यांना ‘पश्चिम स्टार’ आणि ‘संग्राम मेडल’ यांसारख्या अत्यंत प्रतिष्ठेच्या लष्करी पदकांनी सन्मानित करण्यात आले होते. लष्करी गणवेशातील त्यांची ही शिस्त आणि जिद्द आजही त्यांच्या व्यक्तिमत्त्वातून स्पष्टपणे जाणवते.

लष्करी सेवेतून निवृत्त झाल्यानंतर पोतदार यांनी दुसऱ्या इनिंगमध्येही आपली कामाची निष्ठा कायम राखली. त्यांनी पुढील २५ वर्षे दूरसंचार विभागात वरिष्ठ लिपिक म्हणून सेवा बजावून प्रशासकीय कामात आपले योगदान दिले. त्यांच्या पत्नी सौ. केशर राजाराम पोतदार या स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात परिचर्या पदावर कार्यरत असल्याने पोतदार कुटुंब अंबाजोगाईत कायमस्वरूपी स्थायिक झाले. सीमेवर पती देशाचे रक्षण करत असताना सौ. केशर यांनी रुग्णालयातील सेवेसोबतच घराची आणि मुलांच्या संगोपनाची जबाबदारी अत्यंत खंबीरपणे पेलली. त्यांच्या या संयुक्त कष्टातूनच आज त्यांचे कुटुंब समाजात ताठ मानेने उभे आहे.

पोतदार दाम्पत्याच्या संस्कारांचा वारसा त्यांच्या मुलांनीही समर्थपणे पुढे नेला आहे. त्यांचे दोन्ही चिरंजीव डॉ. नितीन पोतदार आणि डॉ. सचिन पोतदार यांनी वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले आणि आज ते शहरात नामांकित डॉक्टर म्हणून रुग्णसेवा करत आहेत. एका माजी सैनिकाने आणि परिचारिकेने अत्यंत कष्टाने आपल्या मुलांना घडवून समाजासाठी दोन सक्षम डॉक्टर दिले, ही बाब अंबाजोगाईकरांसाठी अभिमानास्पद ठरली आहे. ७५ वर्षांचा हा प्रवास केवळ एका व्यक्तीचा नसून तो कष्ट, प्रामाणिकपणा आणि राष्ट्रभक्तीचा एक आदर्श वस्तुपाठ आहे.


Categories

Recent Posts