Breaking

माकेगावात जमिनीच्या वादातून शेतकऱ्यावर जीवघेणा हल्ला; दगडाने डोके फोडले, तिघांवर गुन्हा दाखल

Updated: एप्रिल 20, 2026

By Vivek Sindhu

केज तालुक्यात पवन ऊर्जा प्रकल्पाची ३.५ लाखांची तार लंपास

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

अंबाजोगाई: शेतजमिनीच्या बांधावरून असलेल्या जुन्या वादातून एका शेतकऱ्यावर दगडाने जीवघेणा हल्ला केल्याची घटना अंबाजोगाई तालुक्यातील माकेगाव येथे घडली आहे. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या शेतकऱ्यावर लातूर येथील रुग्णालयात मेंदूची शस्त्रक्रिया करण्यात आली असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. याप्रकरणी अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

माकेगाव येथील संजय उद्धवराव देशमुख (वय ४६, व्यवसाय शेती) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. संजय देशमुख आणि त्यांचे चुलते कल्याण जीवनराव देशमुख यांचे त्यांच्याच नात्यातील नारायण बाबूराव देशमुख यांच्याशी गेल्या दोन वर्षांपासून शेतीच्या बांधावरून घरगुती वाद सुरू आहेत. १६ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास संजय आणि कल्याण देशमुख हे गावातील रोडवर नवनाथ टेलरच्या दुकानाजवळ जळालेल्या मोटरच्या दुरुस्तीबाबत बोलत थांबले होते.यावेळी नारायण बाबूराव देशमुख, अमर नारायण देशमुख आणि अयोध्या नारायण देशमुख हे तिघे आपसात संगनमत करून त्या ठिकाणी आले. ‘तुला लय माजलास, तुला आता खतमच करून टाकतो’ असे म्हणत नारायण देशमुख यांनी कल्याण यांना पकडले, तर अमर देशमुख याने हातातील दगडाने त्यांच्या डोक्यात जोरात मारहाण केली. नारायण यांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली, तर अयोध्या देशमुख यांनी शिवीगाळ केली. या हल्ल्यात कल्याण देशमुख बेशुद्ध पडल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाले.

जखमी कल्याण यांना तातडीने अंबाजोगाईतील सरकारी रुग्णालयात आणि त्यानंतर अधिक उपचारासाठी लातूर येथील सह्याद्री हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. त्यांच्या मेंदूला गंभीर दुखापत झाल्याने शस्त्रक्रिया करण्यात आली असून ते सध्या आयसीयूमध्ये उपचार घेत आहेत. अंबाजोगाई ग्रामीण पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम १०९, ११५(२), ३५२, ३५१(२) आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक रंगनाथ मुरलीधर जगताप या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.


Categories

Recent Posts