Breaking

नव्या बदलांना स्विकारणाऱ्या शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करणार – मयंक गांधी

Updated: मार्च 20, 2026

By Vivek Sindhu

जिथे मने जोडली जातात तिथेच पाणी थांबते - सत्यजित भटकळ

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

जिथे मने जोडली जातात तिथेच पाणी थांबते – सत्यजित भटकळ

परळी – ग्रामीण भागाच्या शाश्वत विकासासाठी केवळ शेतीत बदल करून चालत नाही, तर विचारांत आणि सामूहिक कृतीतही परिवर्तन आवश्यक आहे. याच दृष्टीकोनातून ग्लोबल विकास ट्रस्टकडून “माती, शेती आणि मती” या त्रिसूत्रीवर आधारित कामाला गती देण्यात येत आहे. आतापर्यंत वैयक्तिक पातळीवर शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यावर भर देण्यात आला होता; मात्र आता गाव पातळीवर एकात्मिक विकास घडवून आणण्याचे मोठे उद्दिष्ट समोर ठेवण्यात आले आहे. ग्रामीण भागातील वास्तव पाहता, अनेक शेतकरी नव्या तंत्रज्ञानाचा स्वीकार करण्यास संकोच करतात. काही ठिकाणी पाण्याची आणि ज्ञानाची कमतरता, तर काही ठिकाणी भांडवलाचा अभाव ही मोठी अडचण आहे. या पार्श्वभूमीवर ग्लोबल विकास ट्रस्ट शेतकऱ्यांना एकत्र आणून गट पद्धती विकसित करत आहे. या गटांमुळे केवळ उत्पादनातच वाढ होत नाही, तर दर्जेदार शेती, बाजारपेठेतील योग्य दर आणि सामूहिक निर्णयक्षमतेलाही बळ मिळते. या प्रक्रियेतून शेतकऱ्यांचा आत्मविश्वास वाढत असून ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवसंजीवनी मिळत आहे. अशा बदलांच्या प्रवासात शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत देण्याचा निर्धार मयंक गांधी यांनी व्यक्त केला.

पाण्याचे व्यवस्थापन आणि सामाजिक ऐक्य यांचा अतूट संबंध अधोरेखित करताना पानी फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित भटकळ यांनी महत्त्वपूर्ण मुद्दा मांडला. “जिथे मने जोडली जातात तिथेच पाणी थांबते आणि तिथेच खरी समृद्धी निर्माण होते,” असे सांगताना त्यांनी गावातील एकोपा, सहभाग आणि सामूहिक श्रम यांचे महत्त्व अधोरेखित केले. “एकटा ते ऐकता” हे सूत्र केवळ घोषवाक्य नसून ग्रामीण विकासाचा पाया आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. अंबाजोगाई तालुक्यातील मौजे मांडवा पठाण येथे झालेला कार्यक्रम हा या व्यापक विचारांचा प्रत्यक्ष नमुना ठरला. नव्याने केळी लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना ग्लोबल विकास ट्रस्टच्या माध्यमातून आर्थिक व तांत्रिक सहाय्य देण्यात आले. भांडवलाच्या अभावामुळे मागे राहणाऱ्या शेतकऱ्यांना AU Small Finance Bank च्या माध्यमातून कर्जसहाय्य उपलब्ध करून देण्यात आले, तर सिंचनासाठी ३८ शेतकऱ्यांना ठिबक संचांचे वितरण करण्यात आले.

गुढी पाडव्याच्या शुभमुहूर्तावर उर्वरित शेतकऱ्यांना मदत देऊन या उपक्रमाला पूर्णता देण्यात आली. मांडवा पठाण येथील हनुमान मंदिरात झालेल्या या कार्यक्रमातून एक स्पष्ट संदेश समोर आला. शाश्वत शेती आणि समृद्ध गावांसाठी केवळ संसाधने नाहीत, तर सामूहिक विचार आणि एकजूट हीच खरी ताकद आहे. या कार्यक्रमास ग्लोबल विकास ट्रस्टचे ट्रस्टी संजय परमार, सरपंच गणेश रुद्राक्ष, सत्यप्रेम नरवणे यांच्यासह अनेकांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमास मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते. मांडवा पठाण येथील कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर ग्लोबल विकास ट्रस्टच्या माध्यमातून पापनाशी नदीचे खोलीकरण आणि रुंदीकरण करण्यात येत असून त्यामध्ये GRA घेतले जात आहेत. या संपूर्ण कामाची पाहणी करून त्याच्या प्रत्यक्ष स्वरूपाची पाहणी करण्यात आली. तसेच रेवली, मोहा, करेवाडी आणि कान्नापूर येथील प्रगतिशील शेतकऱ्यांच्या शेतांना भेट देत आंबा, डाळिंब, केळी, लिंबू तसेच रेशीम शेतीची प्रत्यक्ष पाहणी सत्यजित भटकळ यांनी केली. विविध पिकांच्या व्यवस्थापन पद्धती, उत्पादनातील गुणवत्ता आणि शेतकऱ्यांनी अवलंबलेल्या नवकल्पनांची त्यांनी माहिती घेतली. या भेटीदरम्यान त्यांच्या समवेत डि. एल. मोहिते आणि संदीप जोशी उपस्थित होते.


Categories

Recent Posts