Breaking

कोरडेवाडीच्या माजी सरपंचांविरुद्धचे अपात्रतेचे अपील जिल्हाधिकाऱ्यांनी फेटाळले

Updated: मार्च 10, 2026

By Vivek Sindhu

जिल्हाधिकाऱ्यांचा महत्त्वपूर्ण निर्णय

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

पुराव्याअभावी नंदूबाई कोरडे यांना दिलासा

केज तालुक्यातील कोरडेवाडी येथील तत्कालीन सरपंच नंदूबाई रमेश कोरडे यांनी आपल्या पदाचा आणि अधिकाराचा गैरवापर करून ग्रामपंचायतीच्या शासकीय जागेवर अतिक्रमण केल्याचा ठपका ठेवत त्यांना अपात्र ठरवण्यासाठी दाखल केलेले अपील जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी नामंजूर केले आहे. अतिक्रमणाचा ठोस पुरावा सिद्ध न झाल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी हा निर्णय दिला असून यामुळे कोरडे यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

या प्रकरणाची पार्श्वभूमी अशी की, कोरडेवाडी ग्रामपंचायतीच्या तत्कालीन सदस्या महानंदा दत्ता गित्ते यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे अपील दाखल केले होते. सरपंच कोरडे यांनी मालमत्ता क्रमांक ३०२ या सार्वजनिक वापराच्या शासकीय खुल्या जागेवर अतिक्रमण करून पती रमेश कोरडे यांचे नाव बेकायदेशीरपणे भोगवटादार म्हणून नोंदवल्याचा आरोप गित्ते यांनी केला होता. या तक्रारीनंतर विस्तार अधिकारी बी. टी. राठोड यांनी केलेल्या चौकशीत संबंधित जागेच्या मालकी हक्काच्या नोंदीमध्ये व्हाईटनर लावून खाडाखोड केल्याचे निदर्शनास आले. मात्र, ग्रामपंचायत स्तरावर अतिक्रमण नोंदवही नसल्याने प्रत्यक्ष अतिक्रमण झाले आहे किंवा नाही, याचा तांत्रिक बोध होऊ शकला नाही.

सप्टेंबर २०२३ ते नोव्हेंबर २०२५ दरम्यान नऊ वेळा झालेल्या सुनावणीनंतर जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी स्पष्ट केले की, सरपंच नंदूबाई कोरडे यांनी अतिक्रमण केल्याचे ठोस पुराव्याद्वारे सिद्ध होत नाही. त्यामुळे हे अपील विधीग्राह्य धरता येत नाही. असे असले तरी, मालमत्तेच्या नमुना ८-अ मधील खाडाखोड लक्षात घेता, गटविकास अधिकाऱ्यांनी १५ दिवसांच्या आत संबंधित जागेवर ‘सरकारी नोंद’ करण्याची कायदेशीर कार्यवाही पूर्ण करावी आणि तसा अहवाल सादर करावा, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. या सुनावणीत सरपंच कोरडे यांच्या वतीने ॲड. ए. एच. आरडे यांनी बाजू मांडली.


Categories

Recent Posts