Breaking

विड्यात जावाईबापूची गाढवावरून मिरवणूक काढून धुलिवंदन साजरे 

Updated: मार्च 4, 2026

By Vivek Sindhu

विड्यात जावाईबापूची गाढवावरून मिरवणूक काढून धुलिवंदन साजरे

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

केज – केज तालुक्यात जावयाची गाढवावरून धिंड काढण्याची परंपरा यावर्षी देखील कायम राखली गेली. तालुक्यातील जाधवजवळा येथील मूळचे शिवाजी गालफाडे यांची गावातून मिरवणूक काढत त्यांचा सन्मान करण्यात आला.

विडा येथील रहिवाशी असलेल्या अनंतराव देशमुख यांनी नव्वद वर्षांपूर्वी स्वतःच्या जावयाची चेष्टामस्करीत गाढवावरुन मिरवणूक काढली होती तेव्हापासून ही परंपरा सुरु आहे. दरवर्षी आठ दिवस अगोदर पासूनच जावयाच्या शोधासाठी गावातील तरुण फिरत असतात. यानंतर धुलीवंदनाच्या दिवशी जावयाची मिरवणूक काढुन कपडे आणि सोन्याची अंगठी दिली जाते. धुलीवंदनाच्या दिवशी शोधून ठेवलेल्या जावयाला गाढवावर बसून मिरवणूक काढली जाते. त्यात तरुण, वृद्ध याचा विचार न करता जावई असणे आवश्यक असते. गावातील मंडळी उत्साहाने जावई शोध मोहिमेत सहभाग घेतात. 

या वर्षीचा मान शिवाजी गालफाडे या जावयाला मिळाला. गालफाडे हे मूळचे केज तालुक्यातील जाधवजवळा येथील रहिवासी आहेत. पण लग्नानंतर ते सासरवाडी विडा येथेच स्थायिक झाले. ते विडा गावातील बाबुराव दुनघव यांचे जावाई आहेत. गावात त्यांनी घर बांधले आहे. रोजंदारी करून ते चरितार्थ चालवतात. धुळवडीच्या दिवशीच तरुणांचा मोर्चा त्यांच्या घराकडे वळला आणि त्यांनी गदर्भराजवरुन त्यांची मिरवणूक काढली. आपला या मिरवणुकीसाठी नंबर लागेल असे त्यांनीही वाटले नव्हते. रंगाची उधळण करत, गाढवाच्या गळ्यात जुन्या चप्पल-बुटांचा हार घालत त्यांची गाढवावरुन मिरवणूक काढली. सरपंच सुरज पटाईत उपसरपंच सदाशिव वाघमारे, गोविंद देशमुख, राजेभाऊ घोरपडे महादेव पटाईत, दादाराव पटाईत, शिवाजी वाघमारे राजकुमार पटाईत, रोहिदास ढोबळे यांच्यासह ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.

असे फसले शिवाजी गालफाडे :- याच गावातील दगडू पवार यांचे जावई माऊली पटाईत यांना गावकऱ्यांनी पकडले होते. पण चकवा देऊन ज्वारीच्या पिकात पळून गेले. मग त्या नंतर जावई शोध पथकाने घरी असलेल्या शिवाजी गालफाडे यांना ते गाफिल असल्याने अलगद उचलले आणि मग सुरू झाली जावयाची गर्दभ सवारी. 

सरपंच गाडीवरून घसरून किरकोळ जखमी :- जावयाचा शोध घेण्यासाठी तरुणांचे शोध पथके ही येवता, शिंदी, घाटेवाडी येथे रवाना झाले होते. एका पथकात सरपंच सूरज पटाईत हे होते. एका जावयाचा पाठलाग सरपंच सूरज पटाईत यांची मोटार सायकल घसरल्याने ते किरकोळ जखमी झाले. 


Categories

Recent Posts