Vivek Sindhu - Latest Marathi News

Breaking

पारधी समाजाच्या युवकांना अमानुष मारहाण प्रकरणी अखेर गुन्हा दाखल 

Updated: फेब्रुवारी 3, 2026

By Vivek Sindhu

पारधी समाजाच्या युवकांना अमानुष मारहाण प्रकरणी अखेर गुन्हा दाखल

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

ॲट्रॉसिटी आणि गंभीर गुन्हा ऐवजी अदखलपात्र स्वरूपाचा किरकोळ गुन्हा दाखल

गौतम बचुटे/केज :- पारधी समाजाच्या दोन युवकांना अमानुषपणे गुरा ढोरा सारखी मारहाण झालेली असताना आणि मारहाण करणारा मुकादम हा सवर्ण जातीचा असताना त्यांच्यावर ॲट्रॉसिटी आणि गंभीर गुन्हा दाखल करण्या ऐवजी अदखलपात्र स्वरूपाचा किरकोळ गुन्हा दाखल करून अमानुष मारहाण करणाऱ्या ऊस तोड मुकादमाला अभय देण्याचा तर प्रयत्न होत नसावा ? याची चर्चा सुरू आहे. 

या बाबत पारधी समाजातील तरुण राहुल विलास काळे आणि श्रावण महादेव काळे यांनी दिलेली माहिती अशी की, हे पारधी समाजातील दोन तरुण आणि त्यांची चुलती संगीता भास्कर काळे हे नागझरी तालुका केज येथील ऊसतोड मुकादम अशोक मारुती बिक्कड यांच्या कडून उचल घेऊन ते पश्चिम महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील बारामती जवळ असलेल्या सोमेश्वर सहकारी साखर कारखाना येथे ऊस तोडणीसाठी गेले होते. 

दि. ३० जानेवारी, शुक्रवार रोजी त्या दोघांना एका पिक-अप मधून अज्ञात ठिकाणी घेऊन जात सुमारे १० ते १२ लोकांनी त्यांना अमानुष व गुरा ढोरा प्रमाणे बेदम मारहाण केली. दोघांच्या पाठीवर आणि सर्वांगावर काळे निळे वळ उठलेले आहेत. तसेच डोळ्यावर मार दिल्याने त्यांच्या डोळ्याला मार लागलेला आहे. सदर घटना रात्रीची असल्याने त्यांना घटनास्थळ देखील नीट आठवत नाही. दि. ३१ जानेवारी रोजी ते राहुल काळे आणि विलास काळे हे  त्यांना झालेल्या मारहाणीची माहिती देण्यासाठी त्यांच्या नातेवाईक सोबत केज येथील पोलिस ठाण्यात आले आहेत. मात्र बेदम मारहाणीमुळे घाबरलेल्या तरुणांना घटनास्थळच आठवत नसल्याने गुन्हा नोंदवून घेण्या संदर्भात तांत्रिक अडचणी येत होत्या.

दरम्यान दि. २ जानेवारी रोजी संगीता काळे हिच्या तक्रारी वरून केज पोलिस ठाण्यात ऊसतोड मुकादम अशोक मारोती बिक्कड याच्या विरुद्ध दाखल केलेल्या तक्रारीत तिने म्हटले आहे की, त्यांचे व मुकादम यांचे भांडण झाल्यामुळे ते गावाकडे आले असता मुक्कामाने त्यांना केज तालुक्यातील लव्हुरी येथे अडवून चापट बुक्क्यांनी मारहाण केली. पुन्हा जर पैसे मागितले तर जीवे मारून टाकण्याची धमकी दिली. यावरून अशोक मारोती बिक्कड याच्या विरुद्ध केज पोलिस ठाण्यात अदखलपात्र स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चापट बुक्क्यांनी मारहाण केली तर मग अंगावर वळ आणि डोळ्यावर सूज कशी ?:-  तक्रार दाखल करून घेताना पोलिसांनी म्हटले आहे की, मुक्कामाने त्यांना चापट बुक्क्यांनी मारहाण की. मग त्यांच्या अंगावर उठलेले वळ आणि डोळ्याला लागलेला मार कशाचा आहे ?

ॲट्रॉसिटी नुसार गुन्हा का दखल नाही ? :- पारधी समाजाच्या तरुणांना मारहाण करणारा मुकादम हा एकटाच दोघांना मारू शकणार नाही. या त्याचे साथीदार सुद्धा असू शकतात. तसेच मुकादम सवर्ण जातीचा असताना आणि अमानुष मारहाण झालेले तरुण हे पारधी समाजाचे असताना ॲट्रॉसिटी नुसार गुन्हा का नोंद करून घेतला नसावा याची सुद्धा चर्चा आहे.

मुकादमाला वाचविले जातेय का ? :- अशा प्रकारे किरकोळ आणि थातुर मातुर व अदखलपात्र गुन्हा दाखल करून त्या दोन तरुणांना अमानुष व बेदम.मारहाण करणारा मुकादम आणि त्याचे साथीदार यांना ॲट्रॉसिटी आणि जीवे मारण्याचा प्रयत्न करणे अशा गंभीर गुन्ह्यातून वाचविले तर जात नाहीना? याची कुजबुज सुरू आहे.


Categories

Recent Posts