Breaking

जुन्या वादातून हॉटेल चालकावर चाकूने जीवघेणा हल्ला; दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Updated: जानेवारी 12, 2026

By Vivek Sindhu

Beed News 25 2025 07 256b8641c647174a8ce9e5811d5fcc86

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

अंबाजोगाई: अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या कुंबेफळ येथे जुन्या भांडणाच्या कारणावरून एका हॉटेल चालकावर चाकूने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या हल्ल्यात हॉटेल चालक गंभीर जखमी झाला असून, त्याच्या भावालाही दुखापत झाली आहे. याप्रकरणी दोन तरुणांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अशोक पांडुरंग गायकवाड (वय २६, रा. कुंबेफळ) हे आपल्या भावासोबत गावातील ‘तिरुपती टी हाऊस’ नावाचे हॉटेल चालवतात. १० जानेवारी २०२६ रोजी रात्री नऊ वाजेच्या सुमारास अशोक गायकवाड, त्यांचे वडील आणि भाऊ नरसिंग हे हॉटेलमध्ये असताना गावातीलच रोहन चंद्रकांत गोरे आणि ओम अशोक सावंत तिथे आले. जुन्या भांडणाचा राग मनात धरून आरोपींनी अशोक यांना शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. यावेळी झटापटीत एकाने पकडून ठेवले असता रोहन गोरे याने आपल्या जवळील चाकूने अशोक गायकवाड यांच्या पोटात वार केला. भावाला वाचवण्यासाठी नरसिंग मध्ये पडले असता त्यांच्या हाताच्या बोटालाही चाकू लागून दुखापत झाली.

घटनेच्या वेळी हॉटेलमध्ये हजर असलेल्या सूरज गायकवाड, अक्षय भोसले, धीरज चव्हाण आणि अविनाश भोसले यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता दोन्ही आरोपी तिथून पळून गेले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अशोक यांना तातडीने अंबाजोगाई येथील सरकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ च्या कलम ३(५), ३५१(३), ३५१(२), ११५(२), ११८(१), ११८(२) आणि १०९ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रंगनाथ मुरलीधर जगताप करत आहेत.


Categories

Recent Posts