Breaking

जुन्या भांडणातून तरुणांवर लोखंडी गजाने जीवघेणा हल्ला; ८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Updated: जानेवारी 2, 2026

By Vivek Sindhu

पैशांच्या वादातून वृद्धाला मारहाण; मुलानेच बापाला टिफणीच्या नळीने बडवले

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

अंबाजोगाई: तालुक्यातील घाटनांदूर येथे ३१ डिसेंबरच्या सायंकाळी एका तरुणाला आणि त्याच्या मित्रांना आठ जणांच्या टोळीने लाथाबुक्क्यांनी, लोखंडी गजासह दगडाने बेदम मारहाण केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. सहा महिन्यांपूर्वी हरवलेल्या कुत्र्याच्या वादातून ही जुनी कुरापत काढून हा हल्ला करण्यात आला असून, यामध्ये काही तरुण गंभीर जखमी झाले आहेत.

या घटनेची सविस्तर पार्श्वभूमी अशी की, फिर्यादी अजिंक्य अशोक साळवे (वय २२, रा. बलूत्याचा मळा, अंबाजोगाई) यांचा मित्र साहिल काळे याचा लॅब्रा डॉग जातीचा पाळीव कुत्रा जून २०२५ मध्ये हरवला होता. त्याबाबत ‘विवेक सिंधु’ मध्ये जाहिरात देण्यात आली होती. या जाहिरातीचा आधार घेऊन आरोपी करण भरत चव्हाण (रा. घाटनांदूर) याने कुत्र्याचा पत्ता सांगण्यासाठी ५००० रुपयांची ऑनलाईन मागणी केली होती. मात्र, कुत्रा जवळ नसताना केवळ पैसे उकळण्यासाठी फसवणूक होत असल्याचे लक्षात आल्याने साळवे आणि त्यांच्या मित्रांनी विचारणा केली असता, आरोपीने त्यांना जिवे मारण्याची धमकी दिली होती.

३१ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी ५:३० च्या सुमारास अजिंक्य साळवे हे घाटनांदूर येथील सोमेश्वर मेडिकलमध्ये पार्सल देण्यासाठी गेले होते. तेथे जुन्या वादाची कुरापत काढून आरोपी करण चव्हाण, शोहेब कुरेशी आणि ओमकार पंडित मोती यांनी साळवे यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. करण चव्हाण याने दगडाने हाताच्या बोटावर मारून जखमी केले, तर शोहेब कुरेशी याने कमरेच्या बेल्टने पाठीवर प्रहार केले. या प्रकारानंतर साळवे यांनी आपल्या मित्रांना बोलावून घेतले आणि ते सर्वजण दुचाकीवरून अंबाजोगाईकडे परतत असताना महादेव पट्टी परिसरात आरोपींनी त्यांना पुन्हा गाठले.

सायंकाळी ६:०० वाजेच्या सुमारास झालेल्या या दुसऱ्या हल्ल्यात आरोपींनी वेदांत बावने याला पकडून बेदम मारले आणि शोहेब कुरेशी याने लोखंडी गजाचा प्रहार केल्याने तो गंभीर जखमी झाला. या झटापटीत वेदांतच्या गळ्यातील सोन्याची चैनही तुटून पडली. साहिल काळे याला वाचवण्यास गेलेल्या अजिंक्य साळवे यांनाही आरोपींनी लक्ष्य केले. बुलेटचे सायलेंसर, करण चव्हाण याने दगडाच्या साह्याने त्याला रक्तबंबाळ केले. या बेदम मारहाणीत वेदांत बेशुद्ध पडल्याने आरोपी तेथून पसार झाले.

याप्रकरणी अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यात करण भरत चव्हाण, शोहेब कुरेशी, ओमकार पंडित मोती, ऋषिकेश पंडित मोती, पंडित मोती, इमरान शेख आणि अन्य दोन अनोळखी व्यक्तींविरुद्ध
गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक मुरलीधर रामराव खोकले या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.


Categories

Recent Posts