Breaking

शेतकऱ्याचा मुलगा झाला भारतीय रेल्वेत ज्युनिअर इंजिनिअर

Updated: डिसेंबर 26, 2025

By Vivek Sindhu

जॉब करीत अभ्यासला वेळ देत मिळविले यश

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

जॉब करीत अभ्यासला वेळ देत मिळविले यश

केज – डोंगरपट्ट्यातील जिवाचीवाडी (ता. केज) येथील लक्ष्मण आसाराम चौरे या शेतकऱ्याच्या मुलाने प्रतिकूल परिस्थितीतून शिक्षण घेऊन अभियांत्रिकीची पदवी मिळविली. खाजगी कंपनीत जॉब करीत अभ्यासाला वेळ देऊन रेल्वेत नोकरी मिळविण्याची तयारी केली. भारतीय रेल्वेत ज्युनिअर इंजिनिअर पदावर यश मिळवून आपल्या आई – वडिलांच्या कष्टाचे चीज केले.

केज तालुक्यातील जिवाचीवाडी हे गाव डोंगरपट्ट्यात वसलेले गाव असून शेतीतून अपेक्षित उत्पन्न मिळत नसल्याने बहुतांश नागरिक ऊसतोडणी करून उपजीविकेसह मुलांना चांगले शिक्षण देतात. त्यामुळे या गावातून तालुक्यात सर्वाधिक डॉक्टर बनले आहेत. त्याचबरोबर सैन्य दलात आणि इतर क्षेत्रात मुलांनी नाव कमविले आहे. या गावातील शेतकरी आसाराम चौरे यांचे कुटुंब गावापासून ३ किमी दूर टक्कारा वस्तीवर वास्तव्यास असून त्यांनी गावातील इतर मुलांप्रमाणे डॉक्टर इंजिनिअर व्हावे असे स्वप्न पाहून चौरे दाम्पत्याने कष्ट करून आपला मुलगा लक्ष्मण चौरे यास शिकविले. त्यांनी सुरुवातीला लक्ष्मण यांना सानेगुरुजी निवासी शाळेत घातले. दुसरी झाली की त्यांच्या घराची आर्थिक परिस्थिती नाजूक असल्याने लक्ष्मणचे मामा दादासाहेब फुंदे यांनी खडकोनी (ता. बार्शी) येथे शिक्षणासाठी नेले. या गावात इयत्ता १० वी काढून बार्शीच्या शिवाजी महाविद्यालयात इयत्ता १२ वीच्या परीक्षेत चांगल्या गुणाने उत्तीर्ण होत लक्ष्मण यांनी राजाराम बापू इन्स्टिट्युट ऑफ टे्नॉलॉजी कॉलेजमध्ये अभियांत्रिकीची पदवी मिळविली. आता पदवी घेतली, पण नोकरी मिळेपर्यंत आई – वडिलांना हातभार लावण्यासाठी खाजगी कंपनीत जॉब सुरू केले. पण इंजिनिअर होऊन आई वडिलांचे स्वप्न साकार करण्यासाठी त्यांनी अभ्यासात खंड पडू दिला नाही. भारतीय रेल्वेत इंजिनिअर होण्यासाठी त्यांनी परीक्षेची तयारी सुरू केली. भारतीय रेल्वेच्या दोन टप्प्यात झालेल्या परीक्षेत १६ डिसेंबर २०२४ रोजी पहिल्या पेपर मध्ये यश मिळवून त्यांनी दुसऱ्या पेपरची तयारी केली. २२ एप्रिल २०२५ रोजी झालेल्या दुसऱ्या पेपरमध्ये यश मिळविले. त्यानंतर मेडिकल आणि शैक्षणिक प्रमाणपत्रांची पडताळणी पूर्ण झाल्यानंतर २४ डिसेंबर रोजी अंतिम निकाल जाहीर झाला. लक्ष्मण आसाराम चौरे यांची भारतीय रेल्वेत ज्युनिअर इंजिनिअर पदावर निवड झाली आहे. घराजवळ शिक्षणाची सोय नसताना आई वडिलांनी कष्ट करून बाहेरगावी पाठवून शिकविले. लक्ष्मण चौरे यांनी प्रतिकूल परिस्थितीतून मिळविलेले हे यश गावातील इतर तरुणांसाठी पेरणादायी आहे.

आई – वडिलांनी कष्ट करून शिकविले. तर शिक्षणात माझ्या मामाने मोलाचे सहकार्य केले. अभ्यासाच्या जोरावर हे इंजिनिअर होऊन स्वप्न साकार केले.

लक्ष्मण आसाराम चौरे
ज्युनिअर इंजिनिअर, भारतीय रेल्वे.


Categories

Recent Posts