Breaking
Updated: डिसेंबर 23, 2025
देशाच्या सुख-समृद्धीसाठी घातले साकडे
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelपरळी: जगातील सर्वात मोठ्या लोकशाही देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी आणि त्यांचे बंधू अशोक मोदी यांनी आज तीर्थक्षेत्र परळी येथील पाचवे ज्योतिर्लिंग प्रभू वैद्यनाथांच्या मंदिरात दर्शनासाठी भेट दिली. अतिशय साध्या वेशभूषेत आणि भक्तिमय वातावरणात त्यांनी प्रभू वैद्यनाथांची विधीवत पूजा आणि आरती केली. या भेटीदरम्यान त्यांनी देशाच्या कल्याणासाठी प्रार्थना केली.
सोमवारी सकाळी जशोदाबेन मोदी आणि अशोक मोदी यांचे मंदिर परिसरात आगमन झाले. यावेळी मंदिर प्रशासनाच्या वतीने त्यांचे यथोचित स्वागत करण्यात आले. मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यात पुजाऱ्यांनी वैदिक मंत्रोच्चाराच्या जयघोषात विधीवत पूजा पार पाडली. जशोदाबेन यांनी अत्यंत श्रद्धेने प्रभू वैद्यनाथांच्या शिवलिंगाचे दर्शन घेतले आणि पुष्प अर्पण केले.
दर्शनानंतर जशोदाबेन मोदी यांनी प्रभू वैद्यनाथांकडे देशातील सुख-समृद्धी आणि जन-कल्याणासाठी साकडे घातले. या प्रसंगी त्यांच्या चेहऱ्यावरील शांतता आणि साधेपणा पाहून मंदिर परिसरात उपस्थित असलेले अन्य भाविक भारावून गेले होते. कोणताही बडेजाव न ठेवता एका सामान्य भाविकाप्रमाणे त्यांनी रांगेत उभे राहून दर्शन घेतले, जे परळीत चर्चेचा विषय ठरले.
या दौऱ्यात माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी जशोदाबेन मोदी यांचे स्वागत केले. जशोदाबेन मोदी या पंतप्रधानांच्या पत्नी असूनही अत्यंत साधेपणाने राहतात, याची प्रचिती पुन्हा एकदा परळीवासीयांना आली. या आध्यात्मिक भेटीमुळे मंदिर परिसरात दिवसभर उत्साहाचे आणि भक्तीचे वातावरण पाहायला मिळाले. या भेटीदरम्यान परळी पोलीस ठाण्याच्या वतीने मंदिर परिसरात चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मंदिर प्रशासनाचे पदाधिकारी आणि स्थानिक कार्यकर्त्यांनी या दौऱ्याचे नियोजन केले होते.