Breaking
Updated: नोव्हेंबर 12, 2025
पात्र असूनही शेतकऱ्यांना अनुदान मिळेना
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelरमेश आडसकरांनी तहसील प्रशासनाला विचारला जाब
किल्ले धारूर – यावर्षीच्या खरीप हंगामात झालेल्या अतिवृष्टीमुळे तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले होते. शेतकऱ्यांचे हातचे पिक वाहून गेले, बागायती तसेच कोरडवाहू शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागले. या नुकसानीची भरपाई म्हणून शासनाकडून दोन्ही प्रकारच्या शेतकऱ्यांना अनुदान मंजूर करण्यात आले होते. मात्र या अनुदानाचे वितरण अत्यंत संथगतीने होत असून, पात्र असूनही अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात अद्याप रक्कम जमा झालेली नाही. शेतकऱ्यांच्या हक्काच्या या मदतीसाठी शासनाने मंजुरी दिल्यानंतरही महिना उलटून गेला तरी अर्ध्याहून अधिक शेतकरी आर्थिक मदतीपासून वंचित राहिले आहेत, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांच्या तक्रारीची दखल घेत नसल्याने तहसील प्रशासनाला सर्वाधीचे नेते रमेश आडसकर यांनी जाब विचारत पुढील चार दिवसात शेतकऱ्यांच्या अनुदानाच्या समस्या सुटल्या पाहिजे अशी मागणी केली.
या सर्व प्रकारात गाव स्तरावरील तलाठी, मंडळ अधिकारी तसेच तहसील प्रशासनाकडून झालेल्या चुकांमुळे शेतकऱ्यांना न्याय मिळण्यात अडथळे येत असल्याचे स्पष्ट होत आहे. अनेक शेतकऱ्यांचे फार्मर आयडी प्रणालीमध्ये अस्तित्वात असतानाही त्यांना मदत मिळत नाही, तर काही ठिकाणी केवायसी यादी गावात पोहोचल्यावरही ती प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. अनेक शेतकऱ्यांनी वारंवार तहसील कार्यालयात येऊन प्रशासनाचे लक्ष वेधले तरी त्यांना उडवा-उडवीची उत्तरे दिली जात असल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली. या सर्व गैरप्रकाराची माहिती मिळाल्यानंतर कृषी क्षेत्रातील शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी नेहमीच पुढाकार घेणारे राष्ट्रवादीचे नेते रमेश आडसकर यांनी या विषयात स्वतः पुढाकार घेत तहसील कार्यालयात हजेरी लावली.बुधवारी धारूर तहसील कार्यालयात रमेश आडसकर यांनी स्वतः हजर राहून संबंधित कर्मचाऱ्यांना अनुदान वितरणात होणाऱ्या विलंबाबद्दल जाब विचारला. पात्र शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचे अनुदान मिळण्यात नेमके कोणते अडथळे येत आहेत याची सविस्तर चौकशी करत माहिती घेण्यात आली. त्यांनी प्रशासनाला स्पष्ट सूचना दिल्या की पुढील तीन ते चार दिवसांत तालुक्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदानाची रक्कम जमा झाली पाहिजे, शेतकऱ्यांच्या हक्काच्या मदतीसाठी आम्ही शांत बसणार नाही,” असे ठाम सांगत तहसील प्रशासनाने अडचणीतील शेतकऱ्यांच्या अडचणी गतीने सोडवाव्यात अशी मागणी केली.
या वेळी कोळपिंपरी ग्रा.पं. चे उपसरपंच तुषार खुळे, पांगरी सेवा सहकारी सोसायटीचे व्हाईस चेअरमन सचिन थोरात, विकास यादव, गोविंद सोळंके,सुनील यादव,महादेव खुळे, विष्णू सोळंके, बाबूराव सोळंके, सुरेश जाधव तसेच शेकडो शेतकरी तहसील कार्यालयात उपस्थित होते.
=====
शासनाने मंजूर केलेले अतिवृष्टीचे अनुदान अर्ध्याहुन अधिक शेतकऱ्यांना प्राप्त झाले नाही. रब्बी पेरणीसाठी च्या अनुदानाची ही तीच परिस्थिती आहे. फार्मर आयडी असताना शेतकऱ्यांना या समस्येला सामोरे जावे लागत आहे. माझ्या कोळपिंप्री या एकट्या गावात जवळपास दीडशे पात्र शेतकरी अनुदान पासून अद्याप वंचित आहेत. तहसील प्रशासनाकडे याबाबत चौकशी केली असता कायम उडवाउडवीची उत्तरे दिली जातात.
तुषार खुळे
उपसरपंच कोळपिंपरी