Home »
Kaij » यंदा केज तालुक्यात ‘राजमा’ पिकाकडे कल ; हरभरा, ज्वारी, गहू पिकाचा ही पेरा
यंदा केज तालुक्यात ‘राजमा’ पिकाकडे कल ; हरभरा, ज्वारी, गहू पिकाचा ही पेरा
Updated: नोव्हेंबर 5, 2025
यंदा केज तालुक्यात ‘राजमा’ पिकाकडे कल ; हरभरा, ज्वारी, गहू पिकाचा ही पेरा
वापसा नसल्याने रब्बी हंगामाच्या पेरण्यात व्यत्यय
केज – केज तालुक्यात यंदा पावसाने सरासरी ओलांडली असून रब्बी हंगामाच्या पेरण्या सुरू आहेत. मात्र वापसा नसल्याने पेरण्यात व्यत्यय येत असून ढगाळ वातावरण आणि पडणाऱ्या पावसामुळे पेरणीचा टक्का वाढलेला नाही. तर कमी खर्च व कालावधीत जास्त उत्पन्न देणाऱ्या ””राजमा”” (घेवडा, पावटा) या पिकाकडे शेतकऱ्यांचा कल दिसून येत आहे. शिवाय हरभरा, ज्वारी, गहू या अन्नधान्य पिकाचा ही पेरा होत आहे.
केज तालुक्यात १ लाख ५ हजार हेक्टर पेरणी योग्य क्षेत्र असून दरवर्षी रब्बी हंगामात सरासरी ७७ हजार हेक्टर क्षेत्रावर पेरा होतो. पाऊस कमी झाल्यास पेरणीचा टक्का सुद्धा घसरतो. मात्र यंदा पावसाने सरासरी ओलांडली असून नोव्हेंबर उजाडला आहे. मात्र पाऊस पडत असून ढगाळ वातावरण आहे. तर परतीच्या पावसाने व अतिवृष्टीमुळे जमिनीत वापसा नसल्याने पेरण्या करण्यास विलंब होत आहे. तालुक्यात खरीप हंगामात सोयाबीनचा पेरा सर्वाधिक होता. तर सोयाबीन काढून त्या जमिनीवर रब्बी हंगामाच्या पिकांचा पेरा केला जातो. यंदा सोयाबीन पीक वाया गेल्याने आता शेतकऱ्यांच्या आशा रब्बी पिकावर आहेत. सध्या अनेक शेतकरी वापसा होण्याच्या प्रतीक्षेत असून ढगाळ व ओलसर वातावरणामुळे मर, बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढत आहे.
गेल्या दोन हंगामापासून राजमाचे उत्पादन समाधानकारक निघत असल्याने या पिकाचे क्षेत्र दरवर्षी वाढत आहे. तर मागील वर्षी राजमाला प्रति क्विंटल ८ हजार ते १० हजार इतका भाव मिळाला होता. गत हंगामात सुमारे ५ हजार हेक्टरवर राजमाची लागवड झाली होती. तर यंदा हे क्षेत्र १३ हजार हेक्टरपर्यंत वाढण्याचा अंदाज वर्तविला जात आहे. सध्या सर्वत्र राजमा पिकाचा पेरा होत असून शेतकऱ्यांचा कल या पिकाकडे दिसून येत आहे. त्याचबरोबर हरभरा, ज्वारी, गहू या अन्नधान्य पिकाचा पेरा ही समाधानकारक होणार आहे.
म्हणून राजमाला नुकसान भरपाई मिळत नाही
राजमा पिकाला शेतकऱ्यांकडून वाढती पसंती आहे. मात्र या पिकाला राज्य सरकारच्या अधिसूचित पिकांच्या यादीत स्थान मिळालेले नाही. परिणामी, या पिकासाठी पीकविमा योजना अद्याप लागू झालेली नसून बाजारभावात घसरण झाली अथवा उत्पन्न घटल्यास शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारची नुकसान भरपाई मिळत नाही. अशी खंत शेतकऱ्यांतून व्यक्त होत आहे.
रब्बी हंगामात हरभरा मुख्य पीक
केज तालुक्यात खरीप हंगामात सोयाबीन पिकाचा पेरा सर्वाधिक होतो. तर रब्बी हंगामात हरभरा पीकाचा पेरा सर्वाधिक होत असल्याने हे मुख्य पीक मानले जाते. त्यानंतर ज्वारी, गहू पिके घेतली जात असून अलीकडे राजमा पिकाचे क्षेत्र वाढत चालले आहे.
अजून पेरणीची आकडेवारी उपलब्ध नाही
रब्बी हंगामाच्या पेरण्या सुरू होऊन महिनाभराचा कालावधी लोटला आहे. मात्र ऑक्टोबर महिन्यात तालुक्यात कोणत्या पिकाचा किती पेरा झाला, याची आकडेवारी तालुका कृषी कार्यालयाकडे उपलब्ध नसून यंदा रब्बी हंगामाबाबत कृषी कार्यालयाचे कर्मचारी तत्पर नसल्याचे दिसून येत आहे. शेतकऱ्यांना पेरणीपासून कीड नियंत्रण व इतर आवश्यक मार्गदर्शन होणे आवश्यक आहे.
गतवर्षी या पिकाचा पेरा होता
गतवर्षी केज तालुक्यात रब्बी हंगामात पुढील प्रमाणे पेरा झाला होता. हरभरा पिकाची सर्वाधिक ४५ हजाराहून अधिक हेक्टरवर पेरा झाला होता. तर ज्वारी १४ हजार ५९१ हेक्टर व गहू ३ हजार २६७ हेक्टरवर पेरला होता. राजमा ४ हजार ५२३ हेक्टरवर तर मका ६४४ हेक्टरवर पेरली होती.