Home »
Kaij » विहीर, पाण्याची टाकी, पाईपलाईन करीत लिमुंदरा गावाचा सोडविला पिण्याचा पाण्याचा प्रश्न
विहीर, पाण्याची टाकी, पाईपलाईन करीत लिमुंदरा गावाचा सोडविला पिण्याचा पाण्याचा प्रश्न
Updated: ऑक्टोबर 28, 2025
ओवेन्स कॉर्निंग, जनविकास सामाजिक संस्थेचा पुढाकार
ओवेन्स कॉर्निंग, जनविकास सामाजिक संस्थेचा पुढाकार
केज – केज तालुक्यातील कोरडेवाडी ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या लिमुंदरा या छोट्याशा गावातील बहुतांश कुटुंबे ऊसतोड मजूर आहेत. या गावात कुठल्याही प्रकारची पिण्याच्या पाण्याची योजना राबविली नसल्याने पाण्यासाठी ग्रामस्थांची भटकंती सुरू होती. ओवेन्स कॉर्निंग सहकार्यातून जनविकास सामाजिक संस्थेने गावात विहिरीचे खोदकाम व बांधकाम करून पाण्याची टाकी बांधून पाईपलाईन करीत या गावाचा कायमस्वरूपी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविला आहे.
केज तालुक्यातील कोरडेवाडी ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या लिमुंदरा हे गाव डोंगरदऱ्यात वसलेले असून या गावाची ३०० लोकसंख्या आहे. सर्व समाजाची लोक रोजगाराअभावी ऊसतोड मजूर आहेत. गावातील ७० ते ८० टक्के कुटुंबे ऊसतोडणीसाठी स्थलांतरित होतात. गावात शासनाची कुठलीही पिण्याच्या पाण्याची सार्वजनिक योजना राबविण्यात आलेली नाही. त्यामुळे पाण्यासाठी कायम भटकंती करावी लागत होती. या गावातील पिण्याच्या पाण्याचा जिव्हाळ्याचा प्रश्न केज येथील जनविकास सामाजिक संस्थेचे सचिव रमेश भिसे यांनी ओवेन्स कॉर्निंग यांच्याकडे मांडला. त्यानंतर ओवेन्स कॉर्निंगच्या सहकार्यातून जनविकास सामाजिक संस्थेच्या वतीने या गावाचा कायमस्वरूपी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी ग्रामस्थांसोबत बैठक घेऊन त्याचे नियोजन करण्यात आले. विहिरीचे ६० फुट खोल व ५० फुट रुंद खोदकाम विहिरीचे बांधकाम करण्यात आले. तर विहिरीपासून गावापर्यंत व गावांतर्गत असलेल्या इतर वस्त्यांपर्यंत ३७०० फूट पाईपलाईन करण्यात आली. गावात ४० हजार लिटर पाणी साठवण क्षमतेची टाकी ही बांधून देण्यात आली. विहिरीवर इलेक्ट्रिक मोटार, स्टार्टर वायर उपलब्ध करून व्यवस्थित देऊन गावाला सार्वजनिक पिण्याच्या पाण्याचा कायमस्वरूपी प्रश्न सोडविला. विशेष म्हणजे या विहिरीला भरपूर पाणी लागले असून पिण्याच्या पाण्यासह शेतीसाठीही सदर पाणी शेतकऱ्यांना उपयोगात आणता येऊ शकते. या केलेल्या कामाबद्दल ग्रामस्थांकडून ओवेन्स कॉर्निंग व जनविकास सामाजिक संस्थेचे कौतुक व आभार व्यक्त केले जात आहे.
ग्रा. प. कडे ही योजना हस्तांतरित
या पाणीपुरवठा योजनेचे काम पूर्ण करून गावांमध्ये समिती स्थापित केली. सर्व नियोजन समितीद्वारे केले जात असून कोरडेवाडी ग्रामपंचायतला ही योजना हस्तांतरित करण्यात आली आहे. यापुढे सर्व देखभाल ग्रामपंचायतीकडून केले जात आहे.
रमेश भिसे
सचिव, जनविकास सामाजिक संस्था, केज.