Breaking
Updated: ऑक्टोबर 13, 2025
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelआष्टी : तालुक्यातील बावी दरेवाडी येथे रविवारी (दि. १२) सायंकाळी शेतात गेलेल्या राजेंद्र विश्वनाथ गोल्हार (वय ३६) या शेतकऱ्यावर बिबट्याने हल्ला करून ठार केल्याची घटना घडली. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राजेंद्र गोल्हार हे सायंकाळी चारच्या सुमारास आपल्या शेतात काम करत होते. त्यांचा मुलगा शेजारील शेतात बैल चारत होता. अंधार पडला तरी वडील परत न आल्याने मुलाने ग्रामस्थांना माहिती दिली. गावकऱ्यांनी शोध घेत असताना शेतात रक्ताचे डाग, कपड्यांचे तुकडे आणि टॉवेल आढळून आला. यानंतर ग्रामस्थांनी शोधमोहीम सुरू केली असता रात्री सुमारे बारा वाजता डोंगरात गोल्हार यांचा मृतदेह सापडला.
प्राथमिक तपासात हा मृत्यू बिबट्याच्या हल्ल्यामुळे झाल्याचे स्पष्ट झाले आहे. घटनेची माहिती मिळताच विभागीय वन अधिकारी गर्कळ, वनपरीक्षेत्र अधिकारी मुंडे तसेच पोलिस पथक घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालय, आष्टी येथे हलविण्यात आला आहे.
या दुर्दैवी घटनेनंतर गावात हळहळ व्यक्त होत आहे. आ. सुरेश धस यांनी घटनास्थळी भेट देऊन मृताच्या कुटुंबाला शासनाकडून मदत मिळण्यासाठी योग्य ती कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
या घटनेमुळे बावी व परिसरातील नागरिकांमध्ये पुन्हा एकदा बिबट्याच्या दहशतीचे सावट पसरले आहे. वनविभागाकडून परिसरात बिबट्याचा शोध सुरू असून खबरदारीचे उपाय करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.