Breaking

उपासमारीच्या उंबरठ्यावर असलेल्या परप्रांतीय मजुरांना केज व्यापारी महासंघाने दिला मदतीचा हात

Updated: सप्टेंबर 29, 2025

By Vivek Sindhu

उपासमारीच्या उंबरठ्यावर असलेल्या परप्रांतीय मजुरांना केज व्यापारी महासंघाने दिला मदतीचा हात

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

केज : गेल्या काही दिवसांपासून झालेल्या अतिवृष्टीमुळे केज तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. शेतीच्या कामांचा बोजवारा उडाल्याने परराज्यातून आलेल्या ग्रामीण भागातील अनेक मजुरांना रोजगार मिळेनासा झाला आहे. हाताला काम नसल्याने या परप्रांतीय मजुरांवर उपासमारीची वेळ आली. ही गंभीर बाब तहसीलदारांच्या निदर्शनास येताच त्यांनी तातडीने उपाययोजना करण्याचा विचार सुरू केला.

तहसीलदारांनी व्यापारी महासंघाशी संपर्क साधत या मजुरांची उपासमार टाळण्यासाठी काही करता येईल का, अशी विचारणा केली. यावर व्यापारी महासंघाचे अध्यक्ष महादेव सूर्यवंशी यांनी व्यापारी बांधवांना आवाहन केले. आवाहन होताच व्यापाऱ्यांनी तातडीने पुढाकार घेत अवघ्या अर्ध्या तासात तब्बल ५५,२०० रुपये जमा केले.

ही रक्कम तात्काळ तहसीलदारांकडे सुपूर्द करण्यात आली. या कृतीमुळे तालुक्यातील मजुरांना तातडीने दिलासा मिळणार आहे. व्यापारी महासंघाचे अध्यक्ष, सचिव, सर्व पदाधिकारी आणि सदस्यांनी संकटाच्या काळात दाखवलेली ही तत्परता कौतुकास्पद मानली जात आहे.

केज तालुका अतिवृष्टीमुळे मोठ्या संकटातून जात असताना शासनाकडून आणि बाहेरून मदत मिळावी याची अपेक्षा आहे. परंतु त्यापूर्वी आपल्या जवळच्या आणि सक्षम लोकांनी मदत करणे आवश्यक असल्याचे मत व्यापारी महासंघाने व्यक्त केले. व्यापाऱ्यांनी एकजुटीने उचललेले हे पाऊल तालुक्यातील मजुरांसाठी मोठा दिलासा ठरले आहे.


Categories

Recent Posts