Breaking
Updated: सप्टेंबर 26, 2025
बापुराव आंधळे खून प्रकरणातील आरोपींना उच्च न्यायालयातून जामीन मंजूर
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelपरळी : महाराष्ट्रात सर्वत्र गाजलेल्या बापुराव आंधळे खून प्रकरणातील आरोपी मुकुंद गित्ते व राजेश वाघमोडे यांना जामीन मंजूर झाला आहे. औरंगाबाद खंडपीठाचे माननीय न्यायमुर्ती श्री. संजय देशमुख यांनी हा निकाल दिला.
फिर्यादी ग्यानबा उर्फ गोट्या मारोती गित्ते यांच्या फिर्यादीवरून परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. फिर्यादीने दिलेल्या माहितीप्रमाणे, २९ जून २०२४ रोजी रात्री ८.३० च्या सुमारास आरोपी शशिकांत गित्ते व इतरांनी कट रचून बापुराव आंधळे यांच्यावर गोळीबार करून खून केला होता. त्यावेळी फिर्यादी गोट्या गित्ते यांच्यावरही जीव घेण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. या गुन्ह्यात आरोपींवर भादंवि कलम ३०२, ३०७, १२०-ब, २०१ अंतर्गत गुन्हा दाखल झाला होता. अंबाजोगाई सत्र न्यायालयाने आरोपींचा जामीन अर्ज फेटाळला होता.
यानंतर आरोपी मुकुंद गित्ते व राजेश वाघमोडे यांनी ॲड. सुदर्शन साळुंके यांच्यामार्फत उच्च न्यायालय खंडपीठात जामीन अर्ज दाखल केला होता. न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटले आहे की या आरोपींनी फिर्यादीला केवळ लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आहे. आरोपींवर पूर्वी कोणतेही गुन्हे दाखल नाहीत तसेच ते फरार होण्याची शक्यता नाही, त्यामुळे त्यांना जामीन देण्यात यावा.
या प्रकरणात आरोपींची बाजू ॲड. सुदर्शन जी. साळुंके व ॲड. पुजा इंगळे यांनी मांडली, तर सरकारतर्फे ॲड. के. के. नाईक यांनी काम पाहिले.