Breaking

केजमध्ये विराट ओबीसी आरक्षण बचाव मोर्चा

Updated: सप्टेंबर 19, 2025

By Vivek Sindhu

केजमध्ये विराट ओबीसी आरक्षण बचाव मोर्चा संपन्न

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

प्रा. लक्ष्मण हाके यांचा जोरदार प्रहार

केज- ज्या निजामांना आम्ही हाकलून दिले त्यांच्याच पुराव्यांवर आज ओबीसींचे आरक्षण संपवण्याचा कट रचला जात आहे. आणि ओबीसींची झोपडी जर उध्वस्त होत असेल तर आता आम्ही गप्प बसणार नाही असा एल्गार ओबीसी नेते प्राध्यापक लक्ष्मण हाके यांनी पुकारला. ते केज येथे आयोजित ओबीसी आरक्षण बचाव मेळाव्यामध्ये बोलत होते.
केज तालुका सकल ओबीसी समाजाच्या वतीने दिनांक १९ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता ओबीसी आरक्षण बचाव मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी ओबीसी नेते प्राध्यापक लक्ष्मण हाके, नवनाथ वाघमारे तसेच बळीराम खटके यांची या मोर्चाला प्रमुख उपस्थिती होती. शहरातील भवानी चौकातून मुख्य रस्त्याने सदरील मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज चौकात येऊन धडकला. या मोर्चामध्ये तालुक्यातीलच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यातील हजारोंचा ओबीसी समाज एकवटला होता. छत्रपती शिवाजी महाराज चौकात निवेदन दिल्यानंतर सदरील मोर्चाचे रूपांतर जाहीर सभेमध्ये झाले. यावेळी प्राध्यापक लक्ष्मण हाके यांनी जोरदार भाषण करत चारी बाजूने फटकारे मारले. पुढे बोलताना प्राध्यापक हाके यांनी सांगितले की, ज्या निजामांना आपणच हाकलून दिले अशा निजामाच्या नोंदीवर ओबीसींचे आरक्षण धोक्यात आणले जात असल्याचा कट रचल्या जात आहे. एवढेच नव्हे तर गाव गाड्यामध्ये राहणाऱ्या ओबीसी समाजाला प्रवाहाच्या बाहेर फेकण्याचे काम होत असून ओबीसी प्रवर्गातील सुमारे साडेतीनशे जातींवर राज्यकर्ते आणि कांहीं घटक मोठ्या प्रमाणावर अन्याय करत आहेत. तसेच गाव गाड्यामध्ये राहणाऱ्या ओबीसी समाजाची झोपडी कुणी उध्वस्त करण्याचा प्रयत्न कसा करत असेल तर आता आम्ही गप्प बसणार नाही. ज्याला जी भाषा समजते त्याच भाषेमध्ये आम्ही आता उत्तर देण्यासाठी सज्ज असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. ज्या ओबीसी समाजाच्या मतावर आपण निवडून येता त्याच ओबीसी समाजाला संकटामध्ये टाकण्याचे काम जिल्ह्यातील कित्येक राजकारणी करत आहेत. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीमध्ये आम्ही ओबीसी मतदार काय करू शकतो हे दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही.
तर मागच्या कित्येक वर्षांपासून ओबीसी समाजावर अन्याय होत असून ओबीसी समाजातील विद्यार्थ्यांना प्रवाहात आणण्यासाठी महाज्योती सारखी योजना आणण्यात आली. परंतु त्या महाज्योतीला कधीच पुरेसा निधी दिला नसल्याने आजही कित्येक ओबीसी समाजातील विद्यार्थी आपल्या न्याय हक्कापासून वंचित आहेत. जिल्ह्यातीलच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील काही ठराविक नेते ओबीसी समाजामध्येच जाती – जातीमध्ये भांडण लावण्याचे काम करत असून ओबीसी समाजाने जात म्हणून न पाहता वर्ग म्हणून पहावे व या जुलमी जीआरला विरोध करण्यासाठी एकत्र येण्याचे आवाहनही त्यांनी केले. मागच्या दोन वर्षांपासून आम्ही गप्प होतो मात्र विशिष्ट समाजाच्या दबावाखाली येऊन २ सप्टेंबरला जो जीआर सरकारने काढला तो ओबीसीचे आरक्षण संपवण्याचा कट आहे. त्यामुळे दोन सप्टेंबर चा जीआर तात्काळ रद्द करावा अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. तसेच स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांनी जिल्ह्यातील कित्येकांना आमदार खासदार केले परंतु ते बेईमान झाले असा प्रहारही केला. मात्र आता ओबीसी समाज जागा झाला असून येणाऱ्या निवडणुकीमध्ये कोणाला खुर्चीवर बसवायचं हे ठरवणार असून ओबीसी समाजाला गृहीत धरण्याची चूक आता करू नका असा गर्भित इशाराही दिला.
दरम्यान यावेळी नवनाथ वाघमारे, बळीराम खटके यांनीही आपले मनोगत व्यक्त करताना ओबीसी आरक्षणाला धक्का लागत आहे म्हणून आम्ही आता रस्त्यावरची लढाई लढण्यास सज्ज आहोत असा इशारा यावेळी दिला. सदरील मोर्चामध्ये अठरा पगड जातीचे ओबीसी हजारोच्या संख्येने एकवटल्याने मोर्चामध्ये भगवे आणि निळे वादळ दिसून येत होते.


Categories

Recent Posts