Breaking

अस्मानी संकटानंतर सुलतानी अन्याय, बळीराजा कंगाल

Updated: सप्टेंबर 19, 2025

By Vivek Sindhu

किसान सभा घेणार आक्रमण पवित्रा

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

पूरग्रस्त बीड जिल्हा मदतीपासून वंचित; किसान सभा घेणार आक्रमक पवित्रा

परळी (प्रतिनिधी) : बीड जिल्ह्यातील परळी व धारूर तालुक्यासह गुणवरा, पापनाशी, वाण आदी नद्यांच्या खोऱ्यात 15 सप्टेंबरच्या मध्यरात्री झालेल्या मुसळधार पावसाने शेती, घरे, जनावरे, कृषी साहित्य आणि सार्वजनिक सुविधा अक्षरशः उद्ध्वस्त केल्या. वहिती शेती वाहून गेल्याने शेतजमीन दगड-मुरूम उघडी पडली आहे. पूराच्या तडाख्यात शेतकरी आर्थिक व मानसिकदृष्ट्या खचून गेला आहे. या आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपयांची मदत तात्काळ द्यावी, अशी ठाम मागणी किसान सभेच्या शिष्टमंडळाने 19 सप्टेंबर रोजी उपजिल्हाधिकारी परळी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.

पूरग्रस्त भागात शेतीसोबतच पाळीव जनावरे मृत्युमुखी पडली. ठिबक व स्प्रिंकलर संच, बैलगाड्या, शेतीची अवजारे, घरे, विहिरी व वीजपुरवठ्याची साधने वाहून गेली. अनेक रस्ते कोसळले, पूल वाहून गेले, वीजपुरवठा खंडित झाला. ग्रामस्थांच्या जगण्याची साधनसामग्री वाहून गेल्याने लोकांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले.

शासनाने आतापर्यंत नांदेड व परभणी जिल्ह्यासाठीच मदत जाहीर केली असून बीड जिल्ह्याला वगळले. तेथील मदत देखील तुटपुंजी आहे. मराठवाड्यात एप्रिल-मे तसेच जुलै ते सप्टेंबर या कालावधीत मोठ्या प्रमाणावर पिकांचे नुकसान झाले. मात्र बीड जिल्ह्याचा या मदतीत समावेश न झाल्याने शेतकरी संतप्त आहे.

याबाबत किसान सभेचे जिल्हाध्यक्ष कॉ. अॅड. अजय बुरांडे, जिल्हा सचिव कॉ. मुरलीधर नागरगोजे, कॉ. गंगाधर पोटभरे, कॉ. पांडुरंग राठोड यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने उपजिल्हाधिकारी यांची भेट घेतली. हेक्टरी 50 हजार रुपये नुकसानभरपाई, पीकनुकसान मदत, दुरुस्तीसाठी विशेष निधी व सर्व सोयींचे पुनर्बांधणी काम तात्काळ करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली.

सरकारने तात्काळ मदत न दिल्यास किसान सभा आक्रमक पवित्रा घेईल, असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला.


Categories

Recent Posts