Breaking
Updated: सप्टेंबर 16, 2025
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelकेज – कार पुलाच्या कठड्याला धडकून झालेल्या भीषण अपघातात कारमधील दोघे ही ठार झाल्याची घटना केज – मांजरसुंबा राष्ट्रीय महामार्गावर कदमवाडी फाट्याजवळ मंगळवारी (दि. १६) पहाटे ६ वाजेच्या सुमारास घडली. अपघातात मरण पावलेल्या व्यक्तींमध्ये परळी येथील बूट, चप्पलचे ठोक विक्रेते इम्रान इब्राहिम कच्छी (वय ५०) व चालक अझरुद्दीन बाबूमिया शेख (वय ४०) या दोघांचा समावेश आहे.
परळी येथे इम्रान इब्राहिम कच्छी (वय ५०) यांचा फुटवेअरचा ठोक विक्रीचा व्यवसाय आहे. ते काही कामानिमित्त मुंबई येथे गेले होते. तेथून ते कारने (एम.एच. ०२ सीएच ६७८९) परळीकडे निघाले होते. मंगळवारी पहाटे ६ वाजेच्या सुमारास त्यांची कार ही केज – मांजरसुंबा राष्ट्रीय महामार्गावर कदमवाडी फाट्याजवळ आली असता अचानक कार रस्त्याच्या खाली उतरुन पुलाच्या कठड्याला धडकली. या झालेल्या भीषण अपघातात कारमधील इम्रान कच्छी व कार चालक अझरुद्दीन शेख या दोघांचा गंभीर जखमी होऊन जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच केज ठाण्याचे फौजदार उमेश निकम, सहाय्यक फौजदार अशोक सोनवणे, चालक रामहरी शिंदे यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्या दोघांचे मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवून दिले. उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहांचे शवविच्छेदन करुन दोन्ही मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिले.