Breaking

चिमुरडीवरील अत्याचाराविरोधात परळीत मूक मोर्चा, पीडित कुटुंबाला 85 हजारांची मदत

Updated: सप्टेंबर 3, 2025

By Vivek Sindhu

1003820279

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

परळी : परळी रेल्वे स्थानकावर 31 ऑगस्ट रोजी चार वर्षीय चिमुरडीवर झालेल्या अमानुष लैंगिक अत्याचाराच्या घटनेने संपूर्ण जिल्हा संतप्त झाला आहे. या घटनेच्या निषेधार्थ बुधवारी (3 सप्टेंबर) परळीत कडकडीत बंद पाळण्यात आला. राणी लक्ष्मीबाई टॉवर चौकातून रेल्वे स्थानकापर्यंत भव्य मूक मोर्चा काढण्यात आला. महिला, पुरुष, विद्यार्थी, सामाजिक संघटना आणि विविध राजकीय पक्षांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने या मोर्चात सहभागी झाले.

मोर्चादरम्यान “चिमुरडीला न्याय मिळालाच पाहिजे” आणि “बलात्काऱ्यांना फाशी द्या” अशा घोषणा देत नागरिकांनी संताप व्यक्त केला. विशेष म्हणजे या मोर्चात सहभागी झालेल्या महिलांनी उत्स्फूर्तपणे पुढाकार घेत आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी आणि प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून पीडितेला तातडीने न्याय मिळावा, अशी जोरदार मागणी केली.

मोर्चाचा समारोप डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ झाला. यावेळी रेल्वे स्थानकातील सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटींवरही प्रश्न उपस्थित करण्यात आले. आरपीएफ आणि रेल्वे पोलिसांनी हलगर्जीपणा केल्याचा आरोप करत दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.

दरम्यान, मोर्चात सहभागी नागरिकांनी केवळ निषेध नोंदवून थांबले नाहीत, तर पीडित कुटुंबाला आधार देण्यासाठी चालता-चालता आर्थिक निधी गोळा केला. यात तब्बल 85 हजार रुपये जमा झाले. हा निधी तत्काळ पीडित कुटुंबाला सुपूर्द करण्यात आला. परळीकरांच्या या उपक्रमामुळे सामाजिक संवेदनशीलतेचे दर्शन घडले.

मोर्चादरम्यान रेल्वे स्थानक परिसरात दारूच्या नशेत बसलेला एक बेवडा निदर्शनास आला. महिलांनी त्याला हटकले असता त्याने हुज्जत घालण्याचा प्रयत्न केला. संतप्त महिलांनी त्याला जागेवरच चपलांनी चोप दिला. या घटनेवरून परिसरातील नशेड्यांमुळे सुरक्षिततेला धोका निर्माण होत असल्याचे पुन्हा अधोरेखित झाले.

पंढरपूर येथून रोजगाराच्या शोधात परळीत आलेल्या गरीब कुटुंबावर हा अन्याय झाला. त्यामुळे परळीकरांनी जात, धर्म, पंथ याचा कोणताही भेदभाव न ठेवता एकजुटीने या कुटुंबाच्या पाठीशी उभे राहत आपल्या संवेदनशीलतेचे उदाहरण घालून दिले. परळीकरांनी केलेल्या या कृतीमुळे “हीच खरी परळीची वृत्ती आणि संस्कृती” असे चित्र समोर आले आहे.

आता नागरिकांची एकमुखी मागणी आहे की, आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी, प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावे आणि रेल्वे स्थानक परिसरातील सुरक्षेची तातडीने काटेकोर व्यवस्था करावी.


Categories

Recent Posts