Breaking
Updated: सप्टेंबर 3, 2025
ओबीसींसाठी स्वतंत्र उपसमिती; अध्यक्षपद बावनकुळे यांच्याकडे
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelमुंबई : मराठा आरक्षणाचा निर्णय घेतल्यानंतर आता राज्य सरकारने ओबीसींच्या विकासासाठी महत्त्वाचे पाऊल उचलण्याची तयारी केली आहे. ओबीसींसाठी स्वतंत्र मंत्रिमंडळ उपसमिती गठीत करण्याचा निर्णय झाला असून तिचे अध्यक्षपद भाजप नेते आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे सोपविण्यात येणार आहे.
सरकारने नुकताच हैदराबाद गॅझेटियर लागू करून मराठा आरक्षणाचा मार्ग मोकळा केला. या निर्णयाला ओबीसी नेत्यांनी तीव्र विरोध दर्शवला होता. मंत्री छगन भुजबळ यांनी तर मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार टाकून नाराजी स्पष्ट केली होती. या पार्श्वभूमीवर ओबीसींच्या सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक विकासासाठी स्वतंत्र उपसमिती गठीत करण्याचा निर्णय सरकारकडून घेण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
या समितीत एकूण आठ मंत्री असतील. यात भाजपचे चार, राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन आणि शिवसेनेचे दोन मंत्री असणार आहेत. अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासोबत सदस्य म्हणून छगन भुजबळ, पंकजा मुंडे, गणेश नाईक, गुलाबराव पाटील, संजय राठोड, अतुल सावे आणि दत्तात्रय भरणे यांचा समावेश असेल.
समिती ओबीसींसाठी शैक्षणिक, आर्थिक आणि सामाजिक कार्यक्रम आखणार असून त्यांची अंमलबजावणी करण्याच्या दिशा ठरविणार आहे. सरकारच्या या पावलाकडे ओबीसी समाजाची उत्सुकतेने नजर लागली आहे.