Breaking
Updated: ऑगस्ट 31, 2025
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelपरळी : परळी रेल्वे स्थानकावर सहा वर्षीय बालिकेवर अज्ञात नराधमाने अमानुष अत्याचार केल्याची संतापजनक घटना रविवारी दुपारी उघडकीस आली. या घटनेने संपूर्ण शहर हादरले असून नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
पंढरपूर येथील एक दांपत्य आपल्या पाच वर्षीय मुलीसह रोजगाराच्या शोधात परळी येथे रविवारी (31 ऑगस्ट) आले होते. दुपारी 12 वाजताच्या सुमारास रेल्वे स्थानकावर उतरल्यावर आजारी असलेल्या मुलीच्या आईने स्थानकावरच थोडा वेळ विश्रांती घ्यायचा निर्णय घेतला. ती मुलीला कुशीत घेऊन झोपली असताना तिच्या पतीने स्थानक परिसरात थोडा वेळ फिरून येण्याचे ठरवले. त्याच वेळी बालिका आईजवळून थोडी दूर जाऊन खेळत होती.
दरम्यान, एकटी बालिका पाहून अज्ञात नराधमाने तिला उचलून नेले आणि निर्जन भागात नेऊन तिच्यावर अमानुष अत्याचार केला. ही अमानुष घटना 4 वाजताच्या सुमारास घडली. काही वेळाने मुलगी रडत आईकडे परत आली. आईने मुलीला शांत करण्याचा प्रयत्न केला असता तिच्या गुप्तांगातून रक्तस्त्राव होत असल्याचे दिसून आले. यानंतर संपूर्ण प्रकार उघडकीस आला.
पीडित बालिकेला तातडीने परळी उपजिल्हा रुग्णालयात तपासणीसाठी आणण्यात आले होते. मात्र पुढील उपचारासाठी अंबाजोगाई येथील स्वाराती रुग्णालयात हलविण्यात आले आहे. सध्या तिच्यावर उपचार सुरू आहेत.
या प्रकरणात आरोपी अद्याप अज्ञात असून घटनेचे गांभीर्य लक्षात घेत सहा. पोलीस अधीक्षक ऋषिकेश शिंदे यांनी तपास हाती घेतला असून पोलिसांचे पथक नराधम आरोपीचा कसून शोध घेत आहे.