Breaking
Updated: ऑगस्ट 14, 2025
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelमुंबई : राज्यातील 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी झालेल्या सर्व वाहनांवर उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक (HSRP) पाटी बसविणे बंधनकारक असून, यासाठीची अंतिम मुदत राज्य सरकारने पुन्हा एकदा वाढवली आहे. यापूर्वी दिलेली 15 ऑगस्ट 2025 ची मुदत आता 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत वाढवण्यात आली आहे. मुदत संपण्याच्या एक दिवस आधी घेतलेल्या या निर्णयामुळे लाखो वाहनधारकांना दिलासा मिळाला आहे.
सरकारकडून यापूर्वी एचएसआरपी पाटी बसविण्यासाठी वेळोवेळी मुदतवाढ देण्यात आली होती. मात्र, कमी प्रतिसादामुळे अजूनही मोठ्या प्रमाणावर जुन्या वाहनांवर ही प्लेट बसवली गेलेली नाही. परिवहन विभागाच्या अहवालानुसार, अपेक्षित प्रमाणात अपॉइंटमेंट न घेतल्याने ही नवी मुदत जाहीर करण्यात आली आहे.
वाहनधारकांनी http://transport.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर जाऊन एचएसआरपी बसविण्यासाठी ऑनलाइन अपॉइंटमेंट घ्यावी. 30 नोव्हेंबरपर्यंत अपॉइंटमेंट घेतलेल्या वाहनांवर कारवाई होणार नाही. मात्र, त्यानंतरही ज्यांनी पाटी बसवली नाही किंवा अपॉइंटमेंट घेतली नाही, अशा वाहनधारकांवर 1 डिसेंबर 2025 पासून वायुवेग पथकाद्वारे नियमांनुसार कठोर कारवाई केली जाईल.
या कारवाईत दंड, वाहन जप्ती किंवा इतर दंडात्मक उपाययोजना केल्या जाण्याची शक्यता आहे. सरकारने स्पष्ट केले आहे की, अंतिम तारखेपूर्वी पाटी न बसविणाऱ्या वाहनांना कोणतीही माफी किंवा सूट दिली जाणार नाही.
उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी (HSRP) ही स्टीलची प्लेट असून, त्यावर विशिष्ट लेसर कोड, क्रोमियम होलोग्राम आणि कायमस्वरूपी रिव्हेटिंग प्रणाली असते. यामुळे वाहनांची ओळख पटवणे सुलभ होते, बनावट क्रमांक टाळले जातात आणि चोरी झालेल्या वाहनांचा शोध घेणे सोपे होते.
राज्य सरकारच्या या निर्णयामुळे येत्या साडेतीन महिन्यांत वाहनधारकांनी आपली वाहने एचएसआरपीसह अद्ययावत करणे अनिवार्य ठरणार आहे. परिवहन विभागाने वाहनधारकांना विलंब न करता अपॉइंटमेंट घेण्याचे आणि अंतिम क्षणी होणाऱ्या गर्दीपासून वाचण्याचे आवाहन केले आहे.