Breaking
Updated: ऑगस्ट 12, 2025
अंबाजोगाईत शॉपिंग मॉलला मध्यरात्री आग; ३० लाखांचा माल खाक
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelअंबाजोगाई : शहरातील मंडीबाजार परिसरातील प्रगती शॉपिंग मॉलला सोमवारी (दि. ११ ऑगस्ट) मध्यरात्री दीडच्या सुमारास लागलेल्या आगीत तब्बल ३० लाखांपेक्षा अधिक रुपयांचा माल जळून खाक झाला. प्राथमिक अंदाजानुसार ही आग शॉर्टसर्किटमुळे लागली असावी.
मिळालेल्या माहितीनुसार, फय्याज मोमीन यांनी गेल्या सहा महिन्यांपूर्वी प्रगती शॉपिंग मॉल सुरू केला होता. येथे घरसंसार उपयोगी वस्तू, कुलर, कपाट, फर्निचर यांसह विवाह समारंभ व इतर प्रसंगांसाठी लागणाऱ्या वस्तू विक्रीसाठी ठेवण्यात येत असत. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी “१ लाख १० हजार रुपयात ३० वस्तू” अशी ऑफर देण्यात आली होती, ज्यामुळे खरेदीदारांची मोठी गर्दी होत असे.
सोमवारी रात्री दुकान बंद करून मालक घरी गेले होते. मात्र रात्री अंदाजे १.३० वाजता अचानक आग लागली. मॉलमध्ये लाकडी व प्लॅस्टिकच्या वस्तूंचा मोठा साठा असल्याने आगीने काही वेळातच भीषण रूप धारण केले. स्थानिकांनी आणि अग्निशमन दलाने आग विझवण्याचा प्रयत्न केला, मात्र आगीच्या तीव्रतेपुढे ते हतबल ठरले.
या घटनेत अंदाजे ३० लाखांपेक्षा अधिक रुपयांचा माल जळून नष्ट झाला आहे. पुढील तपास सुरू आहे.