Breaking
Updated: जुलै 18, 2025
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelबीड : परळी येथील व्यापारी महादेव मुंडे यांच्या हत्येप्रकरणावर आज विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सविस्तर माहिती दिली. या प्रकरणाचा तपास मोठ्या प्रमाणात सुरु असून, तंत्रज्ञानाच्या मदतीने 196 जणांची विचारपूस करण्यात आली आहे. याशिवाय 83 साक्षीदारांची चौकशी आणि 286 जणांचे मोबाईल तपासण्यात आले असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.
मुख्यमंत्री म्हणाले की, खुल्या मैदानात ही घटना घडल्याने प्रत्यक्षदर्शी साक्षीदार मिळणे कठीण गेले आहे. मात्र, एक महिला दीड महिन्यांनी पुढे आली असून तिच्याकडून तपास सुरु आहे. या प्रकरणात डमी डेटा तपासला जात आहे. महादेव मुंडे यांच्या पत्नीच्या आक्रोशाची आपण पूर्णपणे जाणीव ठेवतो, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. या प्रकरणात कुणालाही पाठिशी घालणार नाही, असा पुनरुच्चार त्यांनी केला.
Also Read: देवळा खून प्रकरणी सात जणांवर गुन्हा दाखल
दरम्यान, याच सभागृहात जलील शेख हत्या प्रकरणाबाबत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी पोलिसांवर हलगर्जीपणाचा आरोप केला. त्यावर मुख्यमंत्री म्हणाले की, जलील शेख हे मनसेचे कार्यकर्ते होते. फिर्यादीने नजीब मुल्ला यांच्यावर कारस्थान रचल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणातील 9 आरोपी ओळखले गेले असून त्यापैकी 7 आरोपींना अटक झाली आहे तर 2 आरोपी अद्याप फरार आहेत. या प्रकरणातील पुरावे पुन्हा पडताळले जातील व चौकशीही नव्याने करण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
महादेव मुंडे हत्या प्रकरण : 16 महिन्यांनंतरही आरोपी मोकाटच
महादेव मुंडे यांची हत्या गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात झाली होती. 16 महिने उलटूनही मुख्य आरोपी अद्याप मोकाट आहेत. वाल्मिक कराड व त्यांच्या साथीदारांनी महादेव मुंडेंची हत्या केल्याचा आरोप असून, अद्याप एकाही आरोपीला अटक करण्यात आलेली नाही. मुंडे कुटुंबियांनी पोलिसांनी तात्काळ आरोपींना अटक करून कठोर शिक्षा करावी, अशी मागणी केली आहे.
Also Read: वाढदिवसाचा केक कापला, पण तलवारीने!
ज्ञानेश्वरी मुंडेंचा आत्महत्येचा प्रयत्न : न्याय न मिळाल्यास जीवन संपवणार
महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी पतीच्या हत्या प्रकरणात न्याय मिळत नसल्याच्या कारणावरून विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याने खळबळ उडाली आहे. सध्या त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत. त्यांनी आरोप केला की, परळीतील बंगल्यावरून फोन आल्याने पोलिस तपास थांबवला गेला. “माझी मुले सतत विचारतात, बाबांना कोणी मारले?” अशा शब्दांत त्यांनी आपली वेदना व्यक्त केली. महिनाभरात न्याय न मिळाल्यास मी जीवन संपवणार, असा इशाराही त्यांनी दिला.